पुराणे ही जीवनाला स्वर्ग करण्यासाठीचे माध्यम-
विद्यावाचस्पती प.पू. स्वानंद पुंड शास्त्री महाराज

पुणे : सगळी साधने नष्ट होणारे कलियुग आहे. कलियुगात सोपे साधन व उन्नतीसाठी मार्ग काय?, विश्वातील सर्वश्रेष्ठ तत्व काय आहे?, असे विचारले तर जीवनाला स्वर्ग करण्यासाठी पुराणे आहेत, असे म्हणावे लागेल. गणेश पुराण व इतर पुराणातील वेगवेगळी नावे, हा चिंतन व अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे या कथा सर्वांनी ऐकायला हव्यात, असे यवतमाळ वणी येथील प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज यांनी सांगितले. 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे अधिक मासानिमित्त श्री गणेश पुराण निरुपण प्रवचन मालिकेचे आॅनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. श्रीगणेशाच्या आकार स्वरुपांचे, त्यांनी केलेल्या विविध लिलांचे वर्णन करणारे गणेश पुराण आहे. 
स्वानंद पुंड शास्त्री म्हणाले, आज सुखाची साधने मिळाली, तरी उन्मत्त होऊ नका. कधी परिस्थिती बदलेले सांगता येत नाही. सुखाच्या काळामध्ये माणसामध्ये नम्रता असायला हवी. आनंदाचा, विनम्रतेचा भाव हवा. सुख-दु:खाचा काळ टिकाऊ नाही. शास्त्र या कथा यासाठी सांगतात की दु:खामध्ये लाजू नका, सुखामध्ये माजू नका. इतरांच्या दु:खामध्ये स्वत:च्या डोळ्यात पाणी येते, ते संत असतात. 
अशोक गोडसे म्हणाले, अधिक मासानिमित्त नवीन प्रवचन मालिकेचे ट्रस्टतर्फे आयोजन करण्यात आले आहे. श्री गणेश पुराण निरुपणाद्वारे गणेशाच्या विविध कथा ऐकण्याची संधी गणेशभक्तांना मिळत आहे. श्री गणेश पुराण कथा दिनांक १६ आॅक्टोबर पर्यंत दररोज दुपारी ४ वाजता दगडूशेठ गणपती या ट्रस्टच्या अधिकृत यू टूयब पेजवर पहायला मिळणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून भक्तांनी अवश्य ऐकावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: