कोरोना प्राथमिक उपचाराचेफलक लावण्याचे पुणे शहरातील ओपीडीवर बंधन – आबा बागुल


पुणे : कोरोना प्राथमिक उपचार केले जातील, असे फलक शहरातील खासगी ओपीडी, दवाखान्यांवरही लावण्यात यावेत असे बंधन महापालिकेने घातले असून क्षेत्रीय कार्यालयांवर याच्या देखरेखीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे,असे काँग्रेस पक्षाचे गटनेते, माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सांगितले.
बागुल म्हणाले की , कोरोना रुग्णाला श्वास घेण्यास त्रास झाल्यास तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागते परन्तु आजार प्राथमिक अवस्थेत असल्यास थंडी, ताप, खोकला यावर खाजगी दवाखान्यात ( ओपीडी ) उपचार घेता येतील. गरज भासल्यास कोरोनाची तपासणी केल्यावर  तपासणीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला की  रुग्णांना रुग्णालयात किंवा कोविड सेंटरमध्ये उपचार दिले जातील. परंतु सद्य स्थितीत तपासणी रिपोर्ट पॉसिटीव्ह आला की, रुग्ण घाबरून जातो आणि रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईकांची तारांबळ उडते. रुग्णालयांमध्ये आधीच गर्दी झालेली आहे, त्यामुळे जागा मिळत नाही किंवा जागा अडविली जाते. अशा रुग्णांनी खासगी ओपीडीत किंवा दवाखान्यातच प्राथमिक उपचार घ्यावेत आणि दवाखान्यांनी व ओपीडीनी कोरोना उपचार केले जातील, असे फलक लावावेत, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली होती. ती मागणी मंजूर झाली असून दवाखान्यांनी फलक लावावेत व सर्दी, खोकला,ताप यावर प्राथमिक उपचार करावेत गरज भासल्यास रुग्णांना कोरोनाची तपासणी करण्यास सांगावे  असे आदेश काढण्यात आले आहेत आणि क्षेत्रीय कार्यालयांना यावर देखरेख ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे आबा बागुल यांनी सांगितले.
शहरामध्ये सुमारे साडेतीन हजार दवाखाने असल्याची माहिती बागुल यांनी दिली. प्राथमिक उपचारांसाठी आवश्यक ती औषधे पालिकेने उपलब्ध करून द्यावीत. यामुळे रुग्णालयांमधील गर्दी टळेल, असे बागुल म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: