मी महाराष्ट्रात अगदी सुरक्षित -अनुराग कश्यप

अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज यावर आपली भूमिका मांडत आहेत. आता निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप सुद्धा या प्रकरणावर भाष्य केलं आहे. “मी महाराष्ट्रात खुश आहे, मला इथं सुरक्षित वाटतं. येथे मला जे बोलायचे आहे ते मी स्पष्टपणे बोलू शकतो,” असं मत अनुराग कश्यपने व्यक्त केलं तो एका मुलाखतीदरम्यान बोलत होता.

अनुराग कश्यप म्हणाला, “मी कुणाचीही बाजू घेत नाही, पण मला महाराष्ट्रात अगदी सुरक्षित वाटतं. मी येथे खुलेपणाने माझी मतं व्यक्त करु शकतो. मागील काळातील अनेक घटनाक्रमामुळे माझ्या मनातील शिवसेनेची प्रतिमा बदलली आहे. त्यामागे एकमेव कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. मी उद्धव ठाकरे यांच्या मतांशी सहमत नसेलही, पण मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं.”

“सरकार सध्या लोकांचं लक्ष खऱ्या मुद्द्यांवरुन हटवून बॉलिवूडवर केंद्रित करत आहे. मी काँग्रेस समर्थक नसून सध्याचं सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे त्याच्या विरोधात आहे,” असंही मत अनुराग कश्यपने व्यक्त केलं. कंगनाने “मुंबईत आता सुरक्षित वाटत नाही, मुंबई आता पाक व्याप्त काश्मिरसारखी वाटायला लागली आहे” असं वक्तव्य केलं होतं. त्यावर अनुराग कश्यपने कंगना रनौतला चांगलंच फैलावर घेतलंय. याआधी अनुराग कश्यप यांनी कंगनावर निशाना साधला होता. “कंगनाची सध्याची वागणूक तिच्या घरच्यांना किंवा मित्रांना दिसत नसेल तर तिचं या जगात खरंच कुणीच नाही. तिच्या जवळचे तिच्या वागण्यातील चुका तिला दाखवत नसतील तर ते तिचंच नुकसान करत आहेत”, असं अनुराग कश्यप म्हणाला.

Leave a Reply

%d bloggers like this: