Tuesday, June 16, 2026
PUNE

जम्बो कोविड सेंटर – प्रशासनाने लोकप्रतिनिधींची फसवणूक केली का? नगरसेविका प्रा.ज्योत्स्ना एकबोटे यांचा सवाल

पुणे – सध्या शहर आणि परिसर हा केवळ राज्यातच नाही, तर देशभरात कोविडचा हॉटस्पॉट बनला आहे. पुण्यातील रुग्ण संख्येला अटकाव करण्यासाठी व कोविडग्रस्तांवर उपचार करण्यासाठी पुणे महानगरपालिका व राज्य सरकारच्या विविध यंत्रणांनी शहरात नव्याने जम्बो कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या सेंटरविषयी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये लोकप्रतिनिधींनाही वेगवेगळी माहिती देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात सध्या तशा सुविधा नव्या कोविड केअर सेंटरमध्ये दिसत नाहीत.
त्याविषयी प्रसार माध्यमांमधून गेल्या काही दिवसांपासून समोर येणारे चित्र हे फारसे आशादायी नाही. त्यामुळे आपल्या प्रशासनाने आम्हा लोकप्रतिनिधींचीच फसवणूक केली आहे का? असा सवाल नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी उपस्थित केला आहे.

महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात प्रा. एकबोटे यांनी म्हटले आहे की, नव्याने उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये अपुऱ्या सोयीसुविधा, अनुभवी डॉक्टर, नर्सेस व इतर आवश्यक मनुष्यबळ यांची कमतरता दिसून येत आहेत. दुसरीकडे आवश्यकतेपेक्षा जास्त सुरक्षारक्षक दिसून येत आहेत. हे अधिकचे सुरक्षाबळ नेमके कोणाच्या सुरक्षेसाठी आहे, असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे. डॉक्टर कमी आणि सुरक्षारक्षक जास्त असलेल्या या परिस्थितीमुळे स्थानिक नागरिक माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींकडे आपली नाराजी तीव्र शब्दांमध्ये मांडत आहेत.
काही दिवसांपूर्वी उपचाराअभावी दोन नागरीकांचा मृत्यू झाला असतानाही आपले आरोग्यप्रमुख हे माध्यमांना प्रतिक्रिया देताना, आपण कार्यालयात फाईल तपासत असल्याचे सांगत आहेत. आजही महापालिकेचे आरोग्य प्रमुख ऑनफिल्ड कमी आणि कार्यालयातच जास्त दिसून येत आहेत. नागरिकांना आरोग्य सेवा देणारे अधिकारी जर जागेवर बसून असतील, तर सामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी आपण खाजगी संस्था व रुग्णालयांवर सोडणार आहोत का ?
कोविड केअर सेंटरमधील रुग्णांच्या डॅश बोर्डच्या या आकडेवारीतही मोठा घोळ झाल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे. कोविड मदतीबाबतच्या आपल्या संपर्क क्रमांकवर फोन उचलण्यासाठी कोणीही उपलब्ध नसते , फोन उचलल्यास व्यवस्थित माहिती दिली जात नाही. याबाबतची तक्रारही माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला वेळोवेळी प्रशासनाकडे करावी लागत असेल तर सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा विचारही करवत नाही.
या कोविड केअर सेंटरमध्ये सर्वसामान्य पुणेकर नागरीकांचा जीव वेठीस धरण्याचे काम प्रशासन करत आहे. आपत्कालीन सेवेसाठीच्या १०८ क्रमांकावर उपलब्ध रुग्णवाहिकेतूनच आलेल्या रुग्णाला येथे प्रवेश दिला जातो. तर मग इतर वाहनाने आलेल्या सर्वसामान्य कोविड रुग्णावरील उपचारांची जबाबदारी हे सेंटर घेणार नाही का ? सर्वसामान्य नागरिकांना जर या कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल व्हायचे असेल तर कोणत्या एजन्सीच्या मार्फत व्हावे याबाबत नागरिक मला प्रश्न विचारात आहेत. त्याबाबतची योग्य ती माहिती आपले प्रशासन नागरिकांना का देत नाही ?
माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला मतदारसंघातील नागरिकांना एखाद्या खाजगी अथवा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करताना चार – चार तास प्रयत्न करावे लागतात तेंव्हा कुठे एखाद्या रुग्णालयात बेड उपलब्ध होते. माझीच जर ही परिस्थिती असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय ?
या सेंटरमध्ये सर्वसामान्यांना हाल सोसावे लागत असतानाच, पत्रकार पांडुरंग रायकर यांचाही याच कोविड केअर सेंटरमध्ये योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. हे सर्व पाहता, त्याला जबाबदार कोण? नेमके किती मृत्यू झाल्यानंतर आपले प्रशासन जागे होणार आहे? सर्वसामान्य पुणेकरांच्या मनात या जम्बो कोविड केअर सेंटरच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तरही तुम्हांला द्यावीच लागतील .
अन्यथा लोकप्रतिनिधी म्हणून वेळप्रसंगी आम्ही प्रशासनाविरोधी भूमिका घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. असेही प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी पत्रात नमूद केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading