राज्याच्या मुख्य सचिवांची शिवसृष्टीला भेट
पुणे : राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी नुकतीच आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क असलेल्या आणि कै. पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आंबेगाव (ब्रुद्रुक) येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’ला भेट देत शिवकाळ अनुभविला.
पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पुणे शहर उपविभागीय अधिकारी सुनील जोशी, हवेली विभागाच्या तहसीलदार अर्चना निकम, मंडळ अधिकारी किशोर पाटील, शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष जगदीश कदम, विश्वस्त विनीत कुबेर, अमृत पुरंदरे, सल्लागार मनोज पोचट, महासचिव डॉ. अजित आपटे यांबरोबरच प्रशासकीय अधिकारी अनिल पवार, प्रकल्प अभियंता प्रमोद साळुंखे, बांधकाम पर्यवेक्षक विलास कोळी आणि व्यवस्थापक अक्षय आरसूळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अग्रवाल यांनी यावेळी अत्याधुनिक पद्धतीच्या प्रोजेक्शन मॅपिंग, होलोग्राफी, अॅनिमेट्रोनिक्स, मोशन सिम्युलेशन, थ्री डी प्रोजेक्शनच्या वापराने शिवसृष्टीत उभारण्यात आलेल्या ‘दुर्गवैभव’ या विभागात शिवाजी महाराजांसाठी महत्वाचे असलेल्या दुर्गांची माहिती घेतली. याबरोबरच ‘रणांगण’ या विभागात मराठेशाहीची साक्ष देणाऱ्या शस्त्रांचे दालन त्यांनी पाहिले. या विभागाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी तलवार, भाला, दांडपट्टा, चिलखत, वाघनखे, कट्यार, तोफ, बंदुका याबरोबरच प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. याशिवाय आग्र्यावरून सुटका, सिंहासनाधिश्वर, श्रीमंत योगी, ‘स्वराज्य, स्वभाषा, स्वधर्म’ या विभागांना त्यांनी भेट दिली. यानंतर शिवसृष्टी येथे साकारण्यात आलेल्या भवानी माता मंदिरात देवीचे दर्शन घेत अग्रवाल यांच्या हस्ते या ठिकाणी देवीची आरती देखील करण्यात आली. सदर मंदिर हे प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराची तंतोतंत प्रतिकृती असून अगदी बांधकामात वापरण्यात आलेला दगड देखील सारखा आहे हे विशेष.
याबरोबरच नजीकच्या भविष्यात शिवसृष्टीत पूर्णत्वास येणा-या विभागांमध्ये २१ एकर परिसरात एक दिवसांची ‘ऐतिहासिक थीम पार्क’ची सफर शिवप्रेमींना करता येणार आहे. यामध्ये महत्त्वाच्या किल्ल्यांचे व्हर्च्युअल रिअॅलिटीद्वारे होणारे दर्शन, प्रतापगडावरील महाराजांचा दरबार, महाराजांनी सुरु केलेल्या चलनी शिवरायी व राजमुद्रा, अश्वशाळा, व्यापारी पेठ, रंगमंदीर, विजयस्तंभ, राजवाडा, दुर्गराज रायगडावरील गंगासागर तलाव, नगारखाना अनुभवायला मिळेल. २१ व्या शतकात वावरणाऱ्या प्रत्येक टेक्नोसॅव्ही व्यक्तीला येथे आल्यानंतर तंत्रज्ञानाच्या बाबतीत कोणतीही कमतरता जाणवणार नाही, असा हा प्रकल्प असेल.
