तृतीयपंथीय समाजाच्या हक्कांसाठी कार्य करणाऱ्या सई राजेंद्र भराट यांना ‘केशव सन्मान पुरस्कार’ जाहीर
पुणे : तृतीयपंथीय समाजाच्या हक्कांसाठी, सामाजिक सन्मानासाठी तसेच धार्मिक व सामाजिक प्रबोधनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सई राजेंद्र भराट (सई नगरकर) यांना ‘केशव सन्मान पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात येणार आहे. हिंदुस्थानातील पहिले शंखवादकांचे पथक म्हणून ओळख असलेल्या केशव शंखनाद पथकाच्या १०व्या वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान सोहळा रविवार, ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता टिळक रस्त्यावरील स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती केशव शंखनाद पथकाचे संस्थापक अध्यक्ष नितीन महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पथकाचे सचिव रणजीत हगवणे,काळूराम डोमाळे, सुहास मदनाल, प्रमोद डोंगरे, शैलेंद्र भालेराव उपस्थित होते. वर्धापन दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. चिदंबरेश्वर महाराज साखरे, (श्री गुरु साखरे महाराज साधक आश्रम, आळंदी) राहणार आहेत. इस्कॉन कात्रजचे राधिका विनोद दास प्रभू यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
नितीन महाजन म्हणाले, सई राजेंद्र भराट यांनी अहिल्यानगरमधील श्रीरामपूर भागात हिंदुत्वाचे कार्य, कृष्णभक्तीचा प्रचार-प्रसार आणि भगवद्गीतेतील उपदेश सोशल मीडिया तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. मठ, सभा व धार्मिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन हिंदुत्वाचा आवाज बुलंद करण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत.
तृतीयपंथीय समुदायाच्या समस्या व संघर्ष समाजासमोर मांडण्यासोबतच शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती करून या समुदायाबद्दलचे गैरसमज दूर करण्याचे काम त्या करतात. समुदायाच्या हक्क व अस्तित्वासाठी आवाज उठविणे, भावी पिढीला चुकीच्या मार्गापासून दूर करून धर्माच्या वाटेवर आणणे, धार्मिक व सामाजिक उपक्रमांत सहभाग, रक्तदान तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक-धार्मिक प्रबोधन असे विविध समाजहिताचे कार्य त्या करीत आहेत.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘केशव सन्मान पुरस्कार २०२६’ त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
