Monday, June 22, 2026
PUNE

करोनामुळे दिवाळी अंकांचे अर्थकारण मोठ्या संकटात : प्रा. मिलिंद जोशी


‘दिवा प्रतिष्ठान’चे पहिले ऑनलाईन अधिवेशन संपन्न,

पुणे- शतकोत्तर दशकपूर्ती केलेल्या दिवाळी अंकांनी महाराष्ट्राचे वैचारिक भरणपोषण केले. दिवाळी अंकांची एकशे अकरा वर्षांची समृद्ध आणि संपन्न परंपरा खंडित होऊ नये यासाठी अनेक संपादकांनी आपले बळ एकवटून, जीव धोक्यात घालून ,आर्थिक तोट्याची तयारी ठेवून दिवाळी अंक प्रकाशित करण्याचे ठरवले आहे ही बाब दिलासादायक आहे करोनामुळे दिवाळी अंकांना जाहिरातीच्या रूपाने आर्थिक मदत करणाऱ्या उद्योगाचे कंबरडे मोडल्यामुळे दिवाळी अंकांचे नेहमीच अडचणीत असणारे अर्थकारण मोठया संकटात सापडले आहे असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. दिवा प्रतिष्ठान आयोजित दिवाळी अंक संपादक, प्रकाशक, लेखक, वाचक, चित्रकार यांच्या पहिल्या ऑनलाईन अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. ऑनलाईन अधिवेशनाचे सह आयोजक ग्रहांकित मासिक व पद्मगंधा दिवाळी अंक होते. अधिवेशनाचे उद्घाटक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, पदमगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे, सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, दिवाचे अध्यक्ष विजय पाध्ये, उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, सचिव शिवाजी धुरी उपस्थित होते.विजय पाध्ये यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी केंजळे यांनी केले.

प्रा. जोशी म्हणाले, ‘दिवाळी पूर्वी करोनाची स्थिती काय असेल यावर अंकांची छपाई, वितरण आणि विक्री या गोष्टी अवलंबून असणार आहेत त्यामुळे अनेक पर्यायांचा विचार करावा लागणार आहे. दिवाळी अंकांशी संबंधित सर्व घटकांनी विचार विनिमय करून अशा परिस्थितीत मार्ग काढला पाहिजे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सहकार्य या कामी ‘दिवा’ प्रतिष्ठानला निश्चितच मिळेल समाजाची वाचनभूक भागविण्यासाठी त्याच्यापर्यंत उत्तम आणि वाचनीय साहित्य पोचवणे ही आपली जबाबदारी आहे.’

प्रकाश पायगुडे म्हणाले, दिवाळी अंक हे महाराष्ट्राचे वैभव आहे. दिवाळी अंकांचा सुवर्णकाळ आता राहिला नाही. सोनार म्हणाले, तरुण पिढी मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे यापुढे दिवाळी अंकांचे वाचक ज्येष्ठ नागरिकच राहतील की काय अशी भीती वाटते. जाखडे म्हणाले, वाचनालयातून दिवाळी अंक नेऊन वाचणाऱ्या वाचकांची संख्या मोठी आहे त्यामुळे वाचनालये सुरू होणे महत्वाचे आहे. या निमित्ताने आयोजित विविध चर्चासत्रात विवेक मेहेत्रे, महेंद्र देशपांडे, धनंजय सिंहासने, सुनील गायकवाड, हेमंत रायकर, भारतभूषण पाटकर, ज्ञानेश्वर जराड, भानू काळे, सूर्यकांत पाठक, डॉ. अरविंद संगमनेरकर, नसिर शेख, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, शारदा धुळुप, आशा ब्राह्मणे, सुनिताराजे पवार, सोनल खानोलकर आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading