पुण्यातील तंत्रज्ञानांनी यशस्वीपणे पूर्ण केले ऋत्विक घटक यांच्या चित्रपटांचे ध्वनी पुनर्संचयनाचे काम
पुण्यातील कॅमिओ मीडिया लॅब्सच्या तांत्रिक पथकाने ध्वनी पुनर्संचयित केलेले ऋत्विक घटक यांचे सहा चित्रपट इटलीतील ‘इल सिनेमा रित्रोवातो’ महोत्सवात प्रदर्शित
पुणे : दिग्गज चित्रपट दिग्दर्शक ऋत्विक घटक यांच्या सहा क्लासिक चित्रपटांचे ध्वनी पुनर्संचयन (audio restoration) यशस्वी करत पुणेस्थित कॅमिओ मीडिया लॅब्सच्या ध्वनी पुनर्संचयन तज्ज्ञांनी चित्रपट संवर्धन क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. घटक यांचे हे ६ चित्रपट इटलीतील बोलोन्या येथे २० जून २०२६ पासून सुरू झालेल्या जागतिक कीर्तीच्या ‘इल सिनेमा रित्रोवातो’ चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येत आहेत. पुनर्संचयित आणि अभिलेखीय चित्रपटांसाठी जगातील सर्वात प्रतिष्ठित व्यासपीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या महोत्सवात नऊ दिवसांत १३ प्रदर्शनांद्वारे हे चित्रपट दाखविले जाणार आहेत. सदर महोत्सव येत्या २८ जून पर्यंत सुरु आहे. भारतीय चित्रपट वारशाचा हा एक अभूतपूर्व आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.
ही प्रदर्शने भारत सरकारच्या नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन अंतर्गत सुरू असलेल्या प्रयत्नांचे फलित आहेत. भारताच्या समृद्ध चित्रपट वारशाचे जतन, पुनर्संचयन आणि दीर्घकालीन संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत हे कार्य करण्यात आले आहे. हा पुनर्संचयन प्रकल्प माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेले नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून राबवले जात आहेत.
हे सहा चित्रपट ऋत्विक घटक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित विशेष उपक्रमाचा भाग आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक प्रभावशाली दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे ऋत्विक घटक यांच्या मेघे ढाका तारा, सुबर्णरेखा, अजांत्रिक आणि जुक्ती तक्को आर गप्पो यांसारख्या चित्रपटांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कथनशैली आणि प्रभावी सामाजिक भाष्यासह जगभरातील चित्रपटप्रेमी व दिग्दर्शकांना प्रेरित केले आहे.
नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनअंतर्गत या चित्रपटांच्या ध्वनी पुनर्संचयनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पुण्यातील कॅमिओ मीडिया लॅब्सकडे सोपविण्यात आली होती. अत्यंत बारकाईने आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात आलेल्या या प्रक्रियेमुळे या अमूल्य चित्रपटांचा मूळ ध्वनीस्वरूप जतन करण्यात यश आले असून त्यांना आधुनिक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या मानकांनुसार सादर करणे देखील शक्य झाले आहे.
ऋत्विक घटक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे पुनर्संचयित चित्रपट सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित केले जात आहेत. लंडनमधील बीएफआय साउथबँक येथे महिनाभराचा विशेष चित्रपट महोत्सव सुरू असून, त्याचबरोबर पुनर्संचयित आणि क्लासिक चित्रपटांच्या जागतिक उत्सव म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘इल सिनेमा रित्रोवातो’ महोत्सवातही हे चित्रपट सादर केले गेले आहेत.
भारतीय क्लासिक चित्रपटांना मिळत असलेली वाढती आंतरराष्ट्रीय मान्यता ही नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनच्या यशाची साक्ष आहे. यापूर्वी जागतिक चित्रपट महोत्सवांच्या क्लासिक आणि रेट्रोस्पेक्टिव्ह विभागांमध्ये केवळ मोजक्याच भारतीय चित्रपटांना स्थान मिळत असे. मात्र, नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनच्या अंतर्गत होत असलेल्या उच्च दर्जाच्या पुनर्संचयन कार्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील क्लासिक चित्रपटांना आता अधिक व्यापक आणि सातत्यपूर्ण आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळू लागले आहे.
या विषयी बोलताना कॅमिओ मीडिया लॅब्सचे सह-संस्थापक पुरब गुजर म्हणाले, “चित्रपट संवर्धन क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येकासाठी पुनर्संचयित केलेले हे क्लासिक चित्रपट प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पोहोचताना पाहणे अत्यंत समाधानकारक आहे. ध्वनी पुनर्संचयन ही अनेकदा पडद्यामागे राहणारी कला असली, तरी चित्रपटाची भावनिक आणि कलात्मक अखंडता जपण्यात तिची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनअंतर्गत ऋत्विक घटक यांच्या चित्रपटांच्या पुनर्संचयनात योगदान देण्याचा आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम कलाकृतींपैकी काहींच्या पुनरुज्जीवनात सहभागी होण्याचा आम्हाला अभिमान आहे. या पुनर्संचयित चित्रपटांना मिळणारी जागतिक मान्यता हे भारताकडे आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्वोच्च निकषांना पूरक अशा पुनर्संचयन क्षमता उपलब्ध असल्याचे द्योतक आहे.”
गेल्या काही वर्षांत कॅमिओ मीडिया लॅब्सने भारतातील महान चित्रपट दिग्दर्शकांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त अनेक चित्रपटांच्या पुनर्संचयनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यामध्ये सत्यजित रे (२०२२),देव आनंद (२०२३), राज कपूर (२०२४), गुरु दत्त (२०२५) आणि आता ऋत्विक घटक (२०२६) यांच्या चित्रपटांचाही समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख चित्रपट महोत्सवांकडून या पुनर्संचयित चित्रपटांची झालेली निवड भारतात होत असलेल्या पुनर्संचयन कार्याच्या गुणवत्तेची साक्ष देणारी असून जागतिक चित्रपट संवर्धन चळवळीत भारताचे वाढते योगदानही अधोरेखित करते.
भारतीय चित्रपट वारशातील या अमूल्य कलाकृतींना जगभरातील प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असताना, नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन आणि त्याचे पुनर्संचयन भागीदार भारताचा समृद्ध चित्रपट वारसा भावी पिढ्यांसाठी जतन, साजरा आणि जागतिक स्तरावर पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत.
