चौपाटीवरील इस्कॉन मंदिर उडवून देण्याची धमकी
गावदेवी पोलिसांकडून तपास जारी
मुंबई: प्रतिनिधी
गिरगाव चौपाटीवरील इस्कॉन मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल मंदिराच्या व्यवस्थापनाला प्राप्त झाला आहे. याबाबत व्यवस्थापनाच्या तक्रारीनुसार गावदेवी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
तामिळनाडू पोलीस संघटनेबाबत दिवंगत नैनार दास यांनी केलेल्या शिफारसी द्रविड मुन्नेत्र कळघम सरकारने त्वरित लागू कराव्या. अन्यथा गिरगाव चौपाटीवरील इस्कॉन मंदिर १६ तासात बॉम्बने उडविण्यात येईल, अशी धमकी या ईमेलद्वारे देण्यात आली आहे. इमॅन्युएल शेखरन नावाच्या व्यक्तीच्या आऊटलूक ईमेल आयडी वरून मंदिर व्यवस्थापनाच्या अधिकृत आयडी वर ही धमकी देण्यात आली आहे.
मंदिराच्या सहाय्यक सुरक्षा व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीनुसार गावदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३५१ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
