शिक्षणतज्ज्ञ संजीव सोनवणे आत्महत्या, ‘I AM GOOD FOOL’ चिठ्ठीमुळे गूढ वाढले
लातूर : लातूरच्या शिक्षण क्षेत्रातील परिचित व्यक्तिमत्त्व संजीव सोनवणे यांनी राहत्या बंगल्यात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, त्यांच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
सोनवणे हे बंगल्यात एकटे असताना ही घटना घडली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी पोलिसांना एक सुसाईड नोट आढळून आली असून ती ताब्यात घेण्यात आली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या चिठ्ठीत ‘I AM GOOD FOOL’ असा मजकूर लिहिलेला असून, आपल्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असेही नमूद करण्यात आले आहे.
सुसाईड नोटमधील मजकूर आणि त्याचा संदर्भ तपासाचा महत्त्वाचा भाग ठरणार आहे. नोटमधील हस्ताक्षराचीही पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. तसेच घटनास्थळी आढळलेले परवानाधारक शस्त्र आणि इतर काही वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
दरम्यान, सोनवणे यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलगी अमेरिकेत वास्तव्यास असल्याची माहिती आहे. कुटुंबीय लातूरला पोहोचेपर्यंत अंत्यविधी पुढे ढकलण्यात आला आहे.
शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या सोनवणे यांनी अचानक टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत त्यांच्या मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांच्या आयुष्यात नेमके काय सुरू होते, त्यांच्यावर कोणता दबाव होता का किंवा अन्य काही कारणामुळे त्यांनी हा निर्णय घेतला का, याबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
मात्र, या प्रश्नांची सध्या कोणतीही अधिकृत उत्तरे उपलब्ध नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून सुसाईड नोट, घटनास्थळावरील पुरावे आणि सोनवणे यांच्या अलीकडील घडामोडींच्या आधारे तपास केला जात आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षण आणि भविष्यासाठी दिशा देणाऱ्या सोनवणे यांच्या मृत्यूने लातूरच्या शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या अखेरच्या चिठ्ठीतील ‘I AM GOOD FOOL’ या शब्दांचा नेमका अर्थ काय आणि त्यांच्या आत्महत्येमागील वास्तविक कारण काय, याचा उलगडा तपासातून होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
