टोरांट प्रकल्पाला विरोध करायचा असेल तर आधी सत्तेतून बाहेर पडा; महेंद्र थोरवेंचे सुनील तटकरेंना खुले आव्हान
रायगड : कर्जत येथील टोरांट वीज प्रकल्पाला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध करायचा असेल, तर सर्वप्रथम सत्तेतून बाहेर पडावे आणि त्यानंतर विरोधासाठी मैदानात उतरावे, असे खुले आव्हान शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांना दिले आहे. राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी टोरांट प्रकल्पाविरोधात केलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना थोरवे यांनी तटकरे कुटुंबीयांवरही निशाणा साधला.
टोरांट प्रकल्पाला केंद्र सरकारने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. असे असताना राज्य सरकारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून या प्रकल्पाला विरोध केला जात आहे. सुनील तटकरे हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या कन्याही राज्य मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे सरकारच्या प्रकल्पाला विरोध करण्यापूर्वी राष्ट्रवादीने सत्तेतून बाहेर पडावे. त्यानंतर त्यांनी विरोधाची भूमिका मांडावी. या विषयावर चर्चा करण्यास आमची तयारी आहे, असे थोरवे यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी खालापूर तालुक्यातील उजळोली येथे उभारण्यात येत असलेल्या कथित मद्यनिर्मिती प्रकल्पाचा मुद्दाही उपस्थित केला. अनिकेत तटकरे आणि सुनील तटकरे यांचे मेहुणे यांच्या भागीदारीत हा कारखाना उभारला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. चिलठण ग्रामपंचायतीचा विरोध असतानाही कथित बोगस ना हरकत प्रमाणपत्रांच्या आधारे या कारखान्याचे काम सुरू असल्याचा दावा थोरवे यांनी केला.
सुधाकर घारे यांना उद्देशून बोलताना थोरवे म्हणाले की, त्यांनी आधी आपल्या नेत्याच्या कुटुंबाशी संबंधित असल्याचा आरोप होत असलेल्या मद्यनिर्मिती कारखान्याला विरोध करावा. त्यानंतर टोरांट प्रकल्पाविरोधात आंदोलनासाठी पुढे यावे. त्यावेळी आम्हीही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू.
कर्जत मतदारसंघातील जनतेने राष्ट्रवादीला नाकारले असून, प्रत्येक विकास प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका पक्षाकडून घेतली जात असल्याचा आरोपही थोरवे यांनी केला. सुनील तटकरे अशा आंदोलनांना पाठिंबा देत असल्याचा दावा करत त्यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
टोरांट वीज प्रकल्प आणि खालापूरमधील कथित मद्यनिर्मिती कारखान्यावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, रायगडमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
