दिव्यांग, अनाथ विद्यार्थ्यांच्या अंतर्मनातील प्रकाशाचा ‘दीपस्तंभ’च्या दिवाळी स्नेहमेलनात सन्मान
पुणे : दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा, जिद्दीचा आणि यशाचा गौरव करत त्यांच्या स्वावलंबनाच्या प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी दीपस्तंभ फाउंडेशन – मनोबलतर्फे आयोजित ‘प्रकाश पूजन’ दिवाळी स्नेहमेलन नुकतेच चितळे सभागृह, एस. पी. कॉलेज येथे उत्साहात संपन्न झाले. शिक्षणाच्या माध्यमातून परिस्थितीवर मात करून स्वावलंबनाचा मार्ग निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंतर्मनातील प्रकाशाचा सन्मान करणे हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश होता. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, तसेच उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या सोहळ्याला पद्मश्री प्रतापराव पवार (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सकाळ पेपर्स प्रा. लि.), लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर (माजी कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक), राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट दिग्दर्शक, लेखक व अभिनेते सुनील सुखथनकर, डॉ. शैलेंद्र देवळाणकर (प्रभारी संचालक, उच्च शिक्षण संचालनालय), राधेश्याम अग्रवाल (उपाध्यक्ष, नियामक मंडळ, शिक्षण प्रसारक मंडळी), दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन, दीपक भाई शाह आणि भरत वोरा आदी मान्यवर उपस्थित होते.
दीपस्तंभच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजवले जाणारे कृतज्ञतेचे मूल्य उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार पद्मश्री प्रतापराव पवार यांनी काढले. ते म्हणाले, “दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम दीपस्तंभ – मनोबलने यशस्वीपणे केले आहे. या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहेत. त्यांना केवळ योग्य संधी आणि पूरक व्यवस्था मिळण्याची गरज आहे. आज हेच विद्यार्थी समाजाच्या मुख्य प्रवाहात नेतृत्व करण्यासाठी पुढे येत आहेत, ही आनंदाची बाब आहे. विद्यार्थ्यांमध्ये कृतज्ञता, चारित्र्याचे संस्कार आणि सामाजिक बांधिलकी रुजविण्याचे संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे. दीपस्तंभच्या कार्यात मी सदैव सहभागी असेन.”
“दीपस्तंभ कुटुंबात माझ्या प्रार्थना आधी पोहोचल्या, मी नंतर पोहोचलो. आजचा सन्मान माझा नसून माझ्या गीतांचा आहे,” अशा भावना सुनील सुखथनकर यांनी व्यक्त केल्या. दिव्यांग, अनाथ आणि दत्तक मुलांच्या विषयांवर अनेक लघुपट आणि माहितीपट केल्यानंतर दीपस्तंभमध्ये आल्यानंतर आपला प्रवास पूर्ण झाल्यासारखे वाटल्याचे त्यांनी सांगितले. साने गुरुजींप्रमाणेच यजुर्वेंद्र महाजन विद्यार्थ्यांवर मायेने प्रेम करतात, असे नमूद करत त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सोहळ्याची सुरुवात सुनील सुखथनकर यांनी रचलेल्या ‘पानी सा निर्मल हो’ या प्रार्थनेने झाली. यावेळी दृष्टिदोष, श्रवणदोष, शारीरिक दिव्यांगत्व तसेच कौटुंबिक आधारापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर केले. नाझनीन शेख, अश्विनी जाधव आणि किरण चौरे यांच्या गायनाने उपस्थितांची मने जिंकली. एक हात नसलेल्या विद्यार्थ्याने आणि एक पाय नसलेल्या विद्यार्थिनीने सादर केलेल्या कोळी नृत्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्रवणबाधित विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘तुझेच गीत मी गात आहे’ या गीतानेही उपस्थितांना प्रभावित केले. माऊली अडकूर हिने पायांनी केलेले हार्मोनियमवादन हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
शिक्षण क्षेत्रातील आणि सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल पद्मश्री प्रतापराव पवार, सुनील सुखथनकर आणि विजय फळणीकर यांना कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या कार्याला आर्थिक पाठबळ देणाऱ्या शैला क्षीरसागर, सागर राका आणि रमेश कासट या वैयक्तिक देणगीदारांचाही गौरव करण्यात आला. तसेच सीएसआर निधीच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या ब्रेम्बो इंडिया प्रा.लि, सुरज बिल्डकॉन आणि एन्प्रो इंडस्ट्रीज या कंपन्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
