Wednesday, November 4, 2026
Latest NewsSports

मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर झालेल्या ‘एमआरएफ इंडियन नॅशनल रेसिंग चॅलेंज‌’ स्पर्धेत पुण्याच्या सार्थक चव्हाण याचा दुसरा क्रमांक !!

पुणे :  मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर झालेल्या ‘एमआरएफ इंडियन नॅशनल रेसिंग चॅलेंज‌’ २डब्ल्यु-२०२६ स्पर्धेत पुण्याच्या १९ वर्षीय आणि पेट्रोनास टिव्हीएस रेसिंग संघाच्या सार्थक चव्हाण याला दुसऱ्या क्रमांकावर समाधानी मानावे लागले.

चैन्नई येथे झालेल्या या तिसऱ्या फेरीमध्ये सर्वात थरारक ठरलेल्या ‘सुपर स्पोर्ट ३०१-४०० सीसी ओपन‌’ गटात बंगळुरच्या चिरांत विश्वनाथने आपला कट्टर प्रतिस्पर्धी आणि ‘पेट्रोनास टीव्हीएस रेसिंग‌’ मधील संघसहकारी सार्थक याला मागे टाकत सलग दुसऱ्या दिवशी पहिले स्थान पटकावून विजयाची नोंद केली. सार्थक याने दोन्ही शर्यतींमध्ये दुसरा क्रमांक मिळवला.

जोरदार झालेल्या पावसामुळे शर्यत अर्धा तास उशीरा सुरू झाली. ही सहा लॅप्सची शर्यत देशातील अव्वल रायडर्सनी दिलेल्या जोरदार चुरशीमुळे अत्यंत नाट्यमय आणि थरारक ठरली. पहिल्या शर्यतीमध्ये (शनिवारी) चिरांग याने विक्रमी लॅप वेळेसह पहिला तर, सार्थक याने दुसरा क्रमांक मिळवला. मोहम्मद मिकैल याने तिसरा आणि रक्षित दवे याने चौथा क्रमांक मिळवला.

दुसऱ्या शर्यतीमध्ये सार्थक आणि चिरांग यांच्यात जोरदार संघर्ष सुरू होता. शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यात एक निर्णायक क्षण आला, जेव्हा चिरांतने सार्थकवर मात करत आघाडी घेतली. यावेळी सार्थकचे नियंत्रण काही क्षणांसाठी विचलित झाले आणि त्याने आपले आघाडीचे स्थान गमावले. बंगळुरूच्या चिरांतने या शर्यतीमध्ये विजय मिळवत या सप्ताहातील आपला दुसरा विजय नोंदवला. सार्थकला पुन्हा एकदा दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

सप्टेंबरमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सार्थकने ‘सुपर स्पोर्ट ३०१-४००सीसी ओपन‌’ या प्रमुख गटात सलग दोन विजय मिळवून दुहेरी मुकूट पटकावला होता आणि पेट्रोनास टिव्हीएस रेसिंग वन-मेक चॅम्पियनशीप स्पर्धेच्या ‘इलेक्ट्रिक आरटीई‌’ या गटातही अव्वल क्रमांक मिळवून तिहेरी मुकूट पटकावला.

सार्थक हा प्रशिक्षक अमोल तळपदे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून फिटनेस कोच मिहीर तेरणीकर यांचेही मार्गदर्शन मिळत आहे.

सविस्तर निकालः

सुपर स्पोर्ट ३०१-४०० सीसी ओपन (शर्यत-२)ः चिरंगत विश्वनाथ (बेंगळुरी, पेट्रोनास टीव्हीएस रेसिंग, ११ मि. ९.६१३ सेकंद); सार्थक चव्हाण (पुणे, पेट्रोनास टीव्हीएस रेसिंग, ११ मि. ९.८७० सेकंद); मोहम्मद मिकैल (तिरूवल्लूर, मॅडरॅबिट रेसिंग, ११ मि. ११.३८३ से.);

——

Leave a Reply