दिया मिर्झाच्या दिवाळी शुभेच्छा व्हिडीओवरून भाजप नेत्यांना हायकोर्टाचे खडे बोल; हटवलेला व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्याचे BMC ला निर्देश
मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झाने दिवाळीत फटाके न फोडण्याचे आवाहन करणाऱ्या व्हिडीओवरून निर्माण झालेल्या वादात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. या व्हिडीओवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना न्यायालयाने सुनावले असून, मुंबई महापालिकेने सोशल मीडियावरून हटवलेला दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत अभिनेत्री दिया मिर्झा आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींचा सहभाग घेण्यात आला होता. या माध्यमातून नागरिकांना प्रदूषणाबाबत जागरूक करण्याचा महापालिकेचा प्रयत्न होता.
मात्र, या मोहिमेत दिया मिर्झाचा समावेश केल्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला. भाजप नेते अमित साटम यांनी सोशल मीडियावर आक्षेप नोंदवत दिवाळी कशी साजरी करावी, हे सांगण्यासाठी दिया मिर्झाची आवश्यकता नसल्याची टीका केली होती. त्यांच्या पोस्टनंतर महापालिकेने अभिनेत्रीचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून हटवला. त्यानंतर अन्य काही भाजप नेत्यांनीही तिच्यावर टीका केली होती.
या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांबाबत नाराजी व्यक्त केली. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने या प्रकरणात राजकीय आक्षेपांमुळे जनजागृती मोहिमेचा व्हिडीओ हटवण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. तसेच हटवलेला व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर प्रसारित करण्याचे निर्देश महापालिकेला दिले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिया मिर्झाने नागरिकांना पर्यावरण आणि आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले होते. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायुप्रदूषण होते आणि त्याचा परिणाम सर्वांच्याच आरोग्यावर होतो, असे तिने व्हिडीओमध्ये म्हटले होते. ‘दिवाळी आवाजाने नव्हे, तर आनंदाने साजरी करा,’ असा संदेश देत तिने नागरिकांना फटाके टाळण्याचे आवाहन केले होते.
या व्हिडीओवरून सुरू झालेल्या वादात आता उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्याने महापालिकेच्या जनजागृती मोहिमा आणि राजकीय विरोध यांच्यातील संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.
