Tuesday, November 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राष्ट्रवादीच्या नेत्यांची अमित शहांसोबत चर्चा; सुनेत्रा आणि पार्थ पवारांच्या अनुपस्थितीने राजकीय चर्चांना उधाण


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला राज्याचे अर्थखाते पुन्हा मिळावे, यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सोमवारी रात्री भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण भेटीत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे जानेवारी महिन्यात अपघाती निधन झाल्यानंतर राज्याचे अर्थखाते भाजपकडे गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या या खात्याची जबाबदारी सांभाळत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली; मात्र त्यांना अर्थखाते देण्यात आले नाही. त्यामुळे हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे मिळावे, अशी पक्षातील नेत्यांची मागणी असल्याचे सांगितले जाते. महायुतीमध्ये केंद्रात आणि राज्यात सहभागी असूनही राष्ट्रवादीला हे खाते अद्याप मिळालेले नाही.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला. पक्षाने छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांचा पराभव झाल्याने पक्षांतर्गत अस्वस्थतेची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी अमित शहा यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.

या भेटीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, समीर भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासह पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. मात्र, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार या दोघांचीही अनुपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.

भेटीचे छायाचित्र समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींविषयी चर्चांना अधिक वेग आला आहे. पक्षात सर्व काही आलबेल आहे का, वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद आहेत का आणि पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वाची दिशा काय असेल, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
गेल्या काही काळापासून पार्थ पवार यांच्या नेतृत्वक्षमतेबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी सुनेत्रा आणि पार्थ पवार यांच्या अनुपस्थितीत अमित शहा यांची भेट घेतल्याने या चर्चांना नवे वळण मिळाले आहे. मात्र, या भेटीचा नेमका उद्देश आणि सुनेत्रा व पार्थ पवार यांच्या अनुपस्थितीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Reply