‘अभिषेक ठाकुर करंडक’ आंतरक्लब खुला गट टेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचे ३ नोव्हेंबरपासून आयोजन !!
पुणे : पुणे क्रिकेट ॲकॅडमी आणि सागर कांबळे यांच्यावतीने आयोजित कै. अभिषेक ठाकुर यांच्या स्मरणार्थ आठव्या ‘अभिषेक ठाकुर करंडक’ आंतरक्लब खुल्या गटाच्या टेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ३ नोव्हेंबरपासून येवलेवाडी येथील ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या मैदानावर सुरू होणार असून मुंबई, रत्नागिरी आणि पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्यातील २० संघ स्पर्धेत झुझंणार आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक सागर कांबळे आणि श्री. नरेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे आठवे वर्ष आहे. शहरातील क्रिकेट खेळाला चालना देण्याच्या उद्देशाने संघटनेच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला असून २० संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. साखळी आणि बाद फेरीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत एकूण दोन लाख रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेत महाराष्ट्रातील रणजीपटू तसेच नामवंत खेळाडू वेगवेगळ्या संघांमध्ये सहभागी झाले आहेत.
गतविजेता गेम चेंजर्स, उपविजेता व्हि-एड्ज्, मुंडे स्पोर्ट्स-मुंबई, एडी स्पोर्ट्स-रत्नागिरी, नॉक-९९, एनबीसी, युनायटेड स्पोर्ट्स क्लब, एबी क्रिकेट क्लब, एमईएस क्लब, प्लॅटीनम क्रिकेट ॲकॅडमी, स्केल-अप अ आणि ब, ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स ॲकॅडमी, हेमंत पाटील ॲकॅडमी, मॅव्हरीक्स्, शशी पाटील इलेव्हन, ऑल स्टार, ब्रेव्हहार्ट क्लब, गॅलॅक्सी ड्रिमर्स आणि यजमान पुणे क्रिकेट ॲकॅडमी असे २० संघ स्पर्धेत झुंझणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या संघाला १ लाख रूपये आणि करंडक तर, उपविजेत्या संघाला ५० हजार रूपये करंडक देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. यामध्ये स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट अष्टपैलु खेळाडू, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आणि सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू अशी पारितोषिके मिळणार आहेत. याशिवाय स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि फायटर ऑफ द मॅच अशी पारितोषिकांची रेलचेल असणार आहे.
