Thursday, September 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

जरांगेंच्या आंदोलनामागे राजकारणाचा वास; आशिष शेलारांचा सवाल


मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे राजकीय शक्तींचा हात आहे का, असा सवाल मंत्री आशिष शेलार यांनी उपस्थित केला. मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. मात्र, या निर्णयांचा उल्लेख न करता जरांगे सातत्याने सरकारवर टीका करीत असल्याचे शेलार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

मराठा समाजाला एसईबीसी आरक्षण देण्यापासून ते आरक्षण न्यायालयीन कसोटीवर टिकावे यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. ओबीसी समाजाच्या धर्तीवर मराठा समाजासाठी विविध निर्णय घेण्यात आले असून, मंत्रिमंडळाचा गटही या विषयावर काम करीत आहे, असे शेलार यांनी सांगितले.
मागील सरकारांच्या काळात मराठा आरक्षणासाठी काय निर्णय घेण्यात आले, याबाबत जरांगे यांनी कधी भूमिका मांडली का, असा प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला. शरद पवार, सुषीलकुमार शिंदे, उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केले. त्यांच्या कार्यकाळात मराठा समाजासाठी काय करण्यात आले, याबाबतही जरांगेंनी बोलावे, असे ते म्हणाले.
फडणवीस आणि शिंदे यांच्या सरकारने मराठा आरक्षणासाठी अनेक निर्णय घेतले असतानाही केवळ याच सरकारवर टीका केली जात असल्याने जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत. जरांगेंच्या आंदोलनामागे नेमका कोणता राजकीय घटक आहे, हे आपल्याला माहिती नाही. मात्र, याबाबत समाजात चर्चा असून जरांगे यांनीच त्यावर स्पष्टीकरण द्यावे, असे शेलार म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सरकार जरांगेंचे आंदोलन हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना शेलार यांनी, आधी शशिकांत शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या तसेच पूर्वीच्या सरकारांनी मराठा समाजासाठी काय केले, याचे उत्तर द्यावे. त्यानंतर सरकारच्या यश-अपयशावर चर्चा करू, असा टोला लगावला.
आंदोलनासाठी परवानगी मागणे हा जरांगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा अधिकार आहे. त्यांना न्यायालयात जाण्याचाही अधिकार आहे. मात्र, आंदोलनाला परवानगी द्यायची किंवा नाही, हा निर्णय पोलिस प्रशासनाचा असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading