सरकारचा मोठा निर्णय; शिंदे समिती, मराठा आरक्षण कक्षाला स्वतंत्र जागा
मुंबई : मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने कूच करत असतानाच राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती आणि मराठा आरक्षण कक्षाच्या कामकाजासाठी प्रशासकीय इमारतीत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. कुणबी नोंदींचा शोध तसेच मराठा आरक्षणासंदर्भातील न्यायालयीन कामकाज याच ठिकाणाहून चालविण्यात येणार आहे.
नवीन प्रशासन भवनाच्या बाराव्या मजल्यावरील पश्चिम बाजूस ऊर्जा विभागासाठी देण्यात आलेली 964.44 चौरस फुटांची जागा शिंदे समिती आणि मराठा आरक्षण कक्षाला देण्यात येणार आहे. प्रत्यक्षात या जागेचे क्षेत्रफळ 775 चौरस फूट आहे. या कार्यालयातून मराठा समाजाशी संबंधित कुणबी नोंदी शोधण्याचे तसेच आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यासाठी आवश्यक असलेल्या कामकाजाचे समन्वय करण्यात येणार आहे. त्यामुळे कुणबी नोंदी शोधणाऱ्या मराठा समाजातील अर्जदारांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, याच इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील पश्चिम बाजूस राज्य निवडणूक आयोगाच्या रोखशाखेला देण्यात आलेली, मात्र अद्याप ताब्यात न घेतलेली 400 चौरस फुटांची जागा आता ऊर्जा विभागाला देण्यात येणार आहे.
तसेच ऊर्जा विभागाला अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्यासाठी गृह विभागाच्या ताब्यातील 1,103 चौरस फुटांच्या जागेचीही फेरवाटप करण्यात आले आहे. अभिलेखानुसार त्यापैकी 845.59 चौरस फूट जागा गृह विभागाची असल्याने 846 चौरस फूट जागा गृह विभागाकडेच ठेवण्यात येणार आहे. उर्वरित 257 चौरस फूट जागा ऊर्जा विभागाला देण्यात येणार आहे.
शिंदे समिती आणि मराठा आरक्षण कक्षाच्या कामकाजासाठी करण्यात आलेले हे जागावाटप त्यांच्या कामाचा कालावधी संपेपर्यंतच लागू राहणार आहे. त्यानंतर संबंधित जागेचा ताबा पूर्ववत ऊर्जा विभागाकडे देण्यात येईल.
