ठाकरे गटाचे शहरप्रमुख बलात्कार प्रकरणी गजाआड
मदतीच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचाराचा आरोप
अहिल्यानगर: प्रतिनिधी
पती पत्नींमधील वाद मिटवण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी लैंगिक शोषण केल्याची फिर्याद पीडित विवाहितेने दाखल केली असून त्यावरून गुन्हा नोंदवून काळे यांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित महिला आणि तिच्या पतीमध्ये सतत वाद होत असल्याने या जोडप्याने मदतीसाठी काळे यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर काळे यांनी या संबंधी चर्चा करण्यासाठी संबंधित महिलेला आपल्या संपर्क कार्यालयात बोलावून घेऊन बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असे पीडित विवाहितेने आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
दुष्काळात तेरावा महिना…
शिवसेना ठाकरे गटात सध्या बिकट परिस्थिती आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर पक्षाला गळती लागली आहे. अहिल्यानगर त्याला अपवाद नाही. त्यातच शहरप्रमुख काळे यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाल्याने पक्षाची अवस्था, दुष्काळात तेरावा महिना, अशी झाली आहे.
