व्यवसायात जोखीम स्वीकारण्याची तरुणांची तयारी हवी -अनिरुद्ध देशपांडे
पुणे : ब्राह्मण समाजात नोकरी देणाऱ्या उद्योजकांची संख्या वाढत आहे. अनेक तरुण काही वर्षे नोकरी केल्यानंतर व्यवसायाकडे वळत आहेत. व्यवसायवाढीसाठी नेटवर्किंग महत्त्वाचे असून, नेटवर्किंग म्हणजे केवळ व्हिजिटिंग कार्डची देवाणघेवाण नव्हे, तर परस्परांशी नातेसंबंध निर्माण करणे होय. त्यातून व्यवसायाला लाभ होतो. तरुणांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) अति अवलंबून न राहता जोखीम स्वीकारून व्यवसाय करावा, असे मत सिटी कॉर्पोरेशन लि.चे अनिरुद्ध देशपांडे यांनी व्यक्त केले.
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) च्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अभिनेता गश्मीर महाजनी यांना सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत सृजन युवा कलाकार पुरस्कार, तर युटोपियन शुगर्स लि.चे संचालक उमेश परिचारक यांना स्व. चंद्रकांत जोशी स्मृतिप्रित्यर्थ युवा उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाला देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, कार्यवाह श्रीकांत जोशी, डॉ. चैतन्य सराफ, विवेक मेढेकर, अजय कुलकर्णी, प्रतिभा संगमनेरकर, अपूर्वा देवगावकर, मंजुषा वैद्य, हर्षल लेले, उपेंद्र केळकर, सचिन पंडित आदी उपस्थित होते. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी असे होते.
उमेश परिचारक म्हणाले, देशाची लोकसंख्या १४० कोटींवर पोहोचली असली, तरी त्या प्रमाणात शेती वाढलेली नाही. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आणि ऑटोमेशनचा वापर करून शेती करण्याशिवाय पर्याय नाही. शेती हा अशिक्षितांचा नव्हे, तर सुशिक्षितांचा व्यवसाय आहे. भविष्यातही शेती हा प्रमुख व्यवसाय राहणार असून, देशाची भूक शेतकरीच भागवू शकतो.
गश्मीर महाजनी म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अपयश स्वीकारण्याची तयारी असावी लागते. सुरुवातीलाच दहा-पंधरा टक्के अपयशाने घाबरणारा उद्योजक होऊ शकत नाही. अपयश माणसाला प्रगल्भ करते. बँक बॅलन्स किंवा गुंतवणूक कुठे केली, यापेक्षा किती कुटुंबांना अर्थार्जनाची संधी उपलब्ध करून दिली, हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या सोहळ्यात पुरस्कार वितरणासह दोन्ही पुरस्कारार्थींच्या यशस्वी प्रवासावर आधारित प्रकट मुलाखतही घेण्यात आली. ब्राह्मण उद्योजकांचे एकत्रीकरण घडवून आणणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. संस्थेच्या युवा कार्यकारिणीने या सोहळ्याचे आयोजन केले होते. आय टी क्षेत्रात काम करणारे समीर व अनुराधा पळनीटकर या भारतीय जोडप्याने अमेरिकेमध्ये ५ हजारहून अधिक किमी सायकल प्रवास केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मंदार महाजन यांनी सूत्रसंचालन केले. विश्राम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. विवेक मेढेकर यांनी आभार मानले.
