सिल्व्हरटन इंडस्ट्रीज लिमिटेड ही खास पर्यावरणपूरक कागदाचे उत्पादन आणि विपणन करणारी कंपनी असून, आपल्या एकत्रित कार्यपद्धतीच्या माध्यमातून ती विविध क्षेत्रांतील उद्योगांना कागद पुरविते. लेखन व मुद्रणासाठीचा कागद, क्राफ्ट पेपर, कपस्टॉक पेपर तसेच इतर विशेष दर्जाचे कागद यांचे उत्पादन ही कंपनी करते. किरकोळ व्यापार, कॉर्पोरेट, शैक्षणिक आणि सरकारी क्षेत्रांमध्ये या उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. तसेच, पॅकेजिंग, एफएमसीजी, दुय्यम पॅकेजिंग, जलद सेवा देणाऱ्या रेस्टॉरंट्ससाठी अन्न व पेय पदार्थांचे पॅकेजिंग, द्रव पॅकेजिंग, लेबल आणि स्टेशनरी उत्पादने, तसेच औषध उद्योगासाठीचे पॅकेजिंग यांमध्येही ही उत्पादने उपयुक्त ठरतात. ‘सिल्व्हरटन इंडस्ट्रीज लिमिटेड’ने सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) या संस्थेकडे आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) सादर केला आहे. कंपनीने प्राथमिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून निधी उभारण्याची योजना आखली आहे. या आयपीओमध्ये 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या समभागांचा समावेश असून, त्याअंतर्गत एकूण 300 कोटींच्या नव्या समभागांची (फ्रेश इश्शू) विक्री केली जाणार आहे. यासोबतच विद्यमान समभागधारकांकडील 3 कोटी 22 लाख समभागांची (ऑफर फॉर सेल) विक्रीदेखील करण्यात येणार आहे. या समभाग विक्रीतून मिळणारा निधी काही विशिष्ट उद्दिष्टांसाठी वापरण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे. सध्याच्या उत्पादन प्रकल्पातच 14 मेगावॅट क्षमतेचा ‘वेस्ट-टू-एनर्जी कॅप्टिव्ह पॉवर प्लॅंट’ आणि ‘कंप्रेस्ड बायोगॅस प्लॅंट’ उभारून शाश्वत ऊर्जा उपक्रमांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक भांडवली खर्चासाठी अंदाजे 177.50 कोटींचा निधी कंपनी वापरणार आहे. त्याचप्रमाणे विद्यमान उत्पादन प्रकल्पात रीवाइंडर व शीटर यंत्रणांची क्षमता वाढविण्यासाठी, तसेच आतील गोदामांची उभारणीसाठी भांडवली खर्चाच्या अनुषंगाने सुमारे 34.64 कोटींचा निधी वापरला जाणार आहे. कंपनीने घेतलेल्या काही कर्जांची पूर्ण किंवा अंशतः परतफेड वा पूर्वपरतफेड करण्यासाठी सुमारे 72 कोटी वापरले जातील. याशिवाय उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट वापरासाठी राखून ठेवण्यात येणार आहे. हे उल्लेख ‘ऑबजेक्ट ऑफ इश्शू’मध्ये नमूद आहेत. ही समभाग विक्री ‘रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’च्या माध्यमातून करण्यात येत असून, विक्रीस आलेले इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) या दोन्ही शेअर बाजारांवर सूचीबद्ध करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे. या इश्यूसाठी पँटोमॅथ कॅपिटल अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड हे ‘बुक रनिंग लीड मॅनेजर’ म्हणून कार्य करीत आहेत.
Like this:
Like Loading...
Read More