विदुषी जया जोग हे अष्टपैलू व्यक्तिमत्व; प्रसिद्ध व्हायोलिनवादक डॉ. नीलिमा राडकर यांचे उद्गार
पुणे : “संगीताच्या जोडीने विदुषी जया जोग यांच्या व्यक्तिमत्वात लेखन, पर्यटन, अध्ययन यांचा संगम आहे. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू झाले आहे. उत्साह, ऊर्जा, आत्मविश्वास, उमेद यांचाही अनुभव त्यांच्या सहवासात मिळतो”, असे उद्गार ज्येष्ठ व्हायोलिनवादक डॉ. नीलिमा राडकर यांनी काढले. जयाताईंचे सांगीतिक व्यक्तिमत्व आणि त्यांचे ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरू राहावे, असेही त्या म्हणाल्या.
निमित्त होते विदुषी जया जोग यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त त्यांच्या शिष्यांनी आयोजित केलेल्या ‘नक्षी स्वर लयीची…’ या विशेष कार्यक्रमाचे. ज्येष्ठ सतारवादक, लेखिका, कवयित्री, गुरु विदुषी जया जोग यांनी २० जुलै रोजी अमृत-महोत्सवी वर्षात पदार्पण केले. या निमित्ताने त्यांच्या संगीतयात्रेचा गौरव करण्याच्या उद्देशाने त्यांच्या शिष्यांनी नवी पेठ येथील एस एम जोशी सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ज्येष्ठ बासरीवादक गुरु पं. केशव गिंडे यांच्या हस्ते विदुषी जया जोग यांचा सत्कार करण्यात आला. प्रसिद्ध व्हायोलिन वादक, रचनाकार डॉ. नीलिमा राडकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. ज्येष्ठ व्हायोलिनवादक विदुषी विद्या डेंगळे, ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. सुचेता भिडे चापेकर, गुरू माधुरी डोंगरे, अभिनेत्री भाग्यश्री देसाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राडकर पुढे म्हणाल्या, “जया जोग यांनी जीवनाच्या अनेक क्षेत्रांत रस घेऊन कार्य केले आहे. त्या स्वतः उत्तम शिष्या आहेतच, आता गुरुच्या भूमिकेतूनही त्यांची कला सेवा सुरू आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीत डौलदारपणा, शिस्त, नियोजन असते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील हे सारे गुण सुरांच्या धाग्यांनी जोडले गेले आहेत. गुणी शिष्यांचा लाभ त्यांना घडला आहे. त्यांची स्वतःची संगीतसाधना आणि ज्ञानदान असेच सुरू राहावे, अशा शुभेच्छा.”
पं. केशव गिंडे यांनी विदुषी जया जोग यांच्यासोबत ‘अनाम प्रेम’ संस्थेच्या माध्यमातून केलेल्या एकत्रित संगीतकार्याचा उल्लेख केला. जयाताईंनी अशीच संगीत सेवा करत शताब्दी गाठावी, असे ते म्हणाले.
मनोगत मांडताना विदुषी जया जोग म्हणाल्या, “आज मागे वळून पाहते, तेव्हा सारे अद्भुत वाटते. संगीताची कुठलीही पार्श्वभूमी नसताना, मी सतारवादन शिकले, उस्ताद उस्मान खाॅसाहेबांसारखे गुरू लाभले, हे सारे आश्चर्यकारक आहे. संगीताची माहिती मी पुण्यात आल्यावरच झाली. मी सतार शिकायला लागले, तेव्हा माझे मन संगीतानुकूल करणे, हे पहिले आव्हान गुरुजी आणि माझ्याही समोर होते. पण माझ्यापाशी जिद्द आणि परिश्रमांची तयारी हे गुण होते, त्यांच्या जोरावर आजवरचा कलाप्रवास शक्य झाला. वयाच्या तिशीनंतर सुरांचे प्रेम निर्माण झाले. गुरुजींकडून दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन मिळाले. राग संगीताची विलक्षण श्रीमंती उमगली. नाद, लय, ताल, सूर आणि राग या पाचही अंगांवर कसून मेहनत कर आणि प्रभुत्व मिळवा, हे गुरूंचे सांगणे होते. स्वतःची मेहनत दाखविण्यासाठी राग ‘वापरायचा’ नाही, हे गुरुवचन मी समजून घेतले. रागभावाचा विचार प्रस्तुतीमध्ये यथाशक्ती करण्याचा प्रयत्न केला. माझ्या रचना त्यातूनच निर्माण झाल्या. परमेश्वरी कृपा आणि गुरुंचे आशीर्वाद, यातूनच हा प्रवास शक्य झाला”.
जयाताईंच्या शिष्यांच्या वतीने राहुल पंडित यांनी प्रातिनिधित मनोगत मांडले. ते म्हणाले, “जयाताईंच्या शिष्यवर्गांत सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत विद्यार्थी आहेत. प्रत्येकाची पार्श्वभूमी, आकलन, क्षमता पारखून त्या ज्ञानदान करतात. रियाजाविषयी अतिशय दक्ष असतात. त्यांची शिस्त विलक्षण आहे आणि एक आभासी छडी घेऊन त्या सतत असतात. ज्ञानदानासोबतच सादरीकरणाचे तंत्र, नियोजन, वाद्याची देखभाल हे घटकही त्या महत्त्वाचे मानतात. त्यासाठी सातत्याने कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करतात. शिष्यांशी त्यांचे ऋणानुबंध जुळले आहेत.”
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात जया जोग यांच्या शिष्यांचे समूह सतारवादन झाले. प्रज्ञा मेने, मानसी दांडेकर, स्वाती घैसास, सुचेता गोसावी, बीना लिमकर, रिशान कुळकर्णी या शिष्यांनी जयाताईंच्या स्वतंत्र रचनांचे सादरीकरण केले. समर्पण (राग तोडी, ताल रूपक), महिरप (राग भैरव, ताल एकताल) आणि इंद्रधनु या रचनांचा त्यात समावेश होता. त्यांना भावना टिकले यांनी तबल्याची साथ केली. त्यानंतर प्रज्ञा मेने आणि व्हायोलिनवादक दीपा कुडतरकर यांनी सहवादनातून राग अहिरभैरवमधील नैवेद्य ही त्रितालातील रचना सादर केली. कार्यक्रमाची सांगता स्वतः विदुषी जया जोग यांच्या सतारवादनाने झाली. त्यांनी राग नटभैरवमधील हिंदोळा ही रचना झपताल व त्रिताल यांच्या मिश्रणातून सादर केली. अद्वैत ही भैरवी रचना (ताल रुद्र) सादर करून त्यांनी सांगता केली. त्यांना अभिजीत बारटक्के यांनी तबल्याची साथ केली. निखिल दाते यांनी आभार मानले तर रंजना काळे यांनी सूत्रसंचालन केले.
