पालकांनी किशोरवयीन मुलांना समजून घेण्याची गरज ; प्रसिद्ध लघुपट दिग्दर्शक राहुल पणशीकर यांचे मत
पुणे : झोपड्पट्टीमधील मुले बालगुन्हेगार असतात यावर आपल्याकडे भरपूर चर्चा होते. पण उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये देखील बालगुन्हेगारीचे प्रमाण भरपूर आहे. पोर्शेसारखा एखादा अपघात घडला किंवा अन्य कोणता प्रकार उघड झाला कीच उच्चभ्रू समाजातील बालगुन्हेगारीवर चर्चा होते असे न होता समाजातील सर्वच स्तरातील मुलांना गुन्हेगारी पासून रोखण्यासाठी पालकांनी त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध लघुपट दिग्दर्शक राहुल पणशीकर यांनी व्यक्त केले. मुलांचे वय वाढत असताना त्यांच्यामध्ये शारीरिक बदल होत असतात त्यामुळे मुले वयात येत असताना पालकांनी मुलांना समजून घेण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
‘राहुलस् ग्राफिक्स’ या संस्थेच्या वतीने किशोरवयीन मुलांना समजून घेण्याची गरज या विषयावर आधारित ‘बेरंग’ या लघुपटाची निर्मिती करण्यात आली असून त्याचा विशेष खेळ नुकताच विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे संपन्न झाला, त्यावेळी राहुल पणशीकर बोलत होते.
फ्लिटगार्ड फिल्टर्सचे विशेष सहाय्य या लघुपटासाठी लाभले असून प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ व शिक्षणतज्ज्ञ असलेल्या पूनम किर्लोस्कर, फ्लीटगार्डच्या मार्केटिंग व कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स विभागाचे प्रमुख पियुष श्रीवास्तव, फ्लीटगार्डचे व्यवस्थापकीय संचालक व लघुपटात मुख्य भूमिका साकारलेले निरंजन किर्लोस्कर, फ्लीटगार्डचे अध्यक्ष व लघुपटात भूमिका साकारलेले संजय कुलकर्णी यांसोबतच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुलांना वाढवत असताना त्यांना योग्य प्रकारे समजावून घेण्याची, पालकत्वात एक संवाद आणि सहानुभूती असण्याची आवश्यकता आहे असे सांगत पूनम किर्लोस्कर म्हणाल्या, “आमच्या उमेदीच्या काळात आम्हाला जे सहन करावे लागले ते आपल्या मुलांना सहन करावे लागू नये असा अनेक पालकांचा आग्रह असतो. हा आग्रह चुकीचा आहे असे मला वाटते. सध्याच्या काळात परिस्थिती बदलत आहे, त्यामुळे मुलांच्या मनात जे विचार सुरु आहेत हे जाणून घेऊन त्यानुसार मुलांसोबत संवाद घडवून आणण्याची जास्त गरज आहे. अनेकदा पालक मुलांना एखाद्या गोष्टीसाठी विरोध करतात त्यांना समजवून घेत नाहीत, त्यामधून अनेक अडचणीचे प्रश्न निर्माण होतात, त्यामुळे असे प्रसंग टाळायचे असतील आणि मुलांना चांगली व्यक्ती म्हणून घडवायचे असेल तर त्यांना समजावून घेण्याची आवश्यकता आहे.” किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्य सक्षमीकरणात पालकांची भूमिका आणि या विषयी जागृती कायमच महत्त्वाची असते याकडेही किर्लोस्कर यांनी लक्ष वेधले. मुलांनीही त्यांच्या पालकांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
किशोरवयीन मुलांची मानसिकता चांगली ठेवणे हा आजच्या काळात महत्वाचा विषय आहे. मुले गुन्हेगारीकडे वळणार नाहीत, याकडे पालक म्हणून लक्ष देताना त्याबाबत समाजामध्ये चळवळ निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे पियुष श्रीवास्तव म्हणाले. ते पुढे म्हणाले की “बेरंग हा केवळ एक चित्रपट नसून आज किशोरवयीन मुलांशी संवाद साधण्यासाठीची एक चळवळ आहे. चित्रपटाची कथा पटकथा ही पडद्याच्या पलीकडे असली तरी, ती प्रत्यक्षात अनेक जीवनांना स्पर्श करते असे मला वाटते. किशोरवयीन मुलांचे मानसिक आरोग्य हे आजच्या काळातील एक गंभीर संभाषण आहे. माहितीच्या अतिरेकाच्या, स्वतःच्या प्रतिमेच्या संघर्षाच्या आणि शैक्षणिक अपेक्षांच्या युगात, हे ओझे किशोरवयीन मुलांवर परिणाम करत आहे आणि ते हे ओझे शांतपणे वाहून घेत आहेत.” अशा सामाजिक कारणासाठी बेरंग या लघुपटाच्या माध्यमातून एक ठिणगी निर्माण झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
