विरोधकांना न्यायालयात खेचण्याची भाषा करणाऱ्या कृषीमंत्र्यांवर रोहित पवार यांचा पलटवार
मुंबई: प्रतिनिधी
अधिवेशन काळात विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळत असल्याच्या विरोधकांच्या आरोपाचा प्रतिवाद कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला. त्यावेळी त्यांनी विरोधकांना न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पलटवार केला आहे. समाज माध्यमांवर एक प्रदीर्घ पोस्ट करून त्यांनी कोकाटे हे धडधडीत खोटे बोलत असल्याचा आरोप केला.
या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात की, _सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा… आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय.. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती.
विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय.. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा._
