मी विनयभंग केला की चोरी केली?’ राजीनाम्याच्या प्रश्नावर माणिकराव कोकाटे यांचा सवाल
मुंबई: प्रतिनिधी
राजीनामा देण्याएवढे काय मोठे घडले आहे? मी विनयभंग केला की चोरी केली, असे सवाल कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांनाच केले.
अधिवेशन काळात विधिमंडळात कोकाटे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रसिद्ध केला. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कोकाटे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
विशेष कार्यकारी अधिकाऱ्याकडून माहिती घेण्यासाठी मला कॉल किंवा मेसेज करावा लागतो. त्याप्रमाणे मी मोबाईल सुरू केल्यानंतर रमीच्या जाहिरातीचा व्हिडिओ सुरू झाला. ही 15 सेकंदाची जाहिरात पूर्ण झाल्याशिवाय व्हिडिओ बंद करता येत नाही. त्याच काळात त्याचे चित्रण करण्यात आले, असे स्पष्टीकरण कोकाटे यांनी दिले आहे.
या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीची विनंती आपण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करणार आहोत. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर त्याबद्दल मुख्यमंत्री किंवा कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन करावे. आपण क्षणभरही न थांबता राजीनामा देऊ. त्यासाठी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना न भेटता थेट राज्यपालांकडे जाऊ, असेही कोकाटे म्हणाले.
सध्याच्या काळात नुसता पाय घसरला तरी दारू प्यायला असेल, गांजा ओढला असेल, अशा प्रकारची टीका समाज माध्यमातून केली जाते. माझ्यावर आरोप करणाऱ्यांना मी न्यायालयात खेचणार आहे, असा इशाराही कोकाटे यांनी दिला.
रमी खेळताच येत नाही
मला रमी खेळताच येत नाही. मोबाईलवर रमीचा खेळ सुरू झाल्यापासून मी एक रुपयाचाही खेळ खेळलेलो नाही. मी माझ्या बँक खात्यांची माहिती सादर करणार आहे. रमी खेळण्यासाठी त्याला बँकेचे खाते जोडावे लागते. माझे कोणतेही बँक खाते अशा रमीच्या अँपला जोडलेले नाही. याची सविस्तर चौकशी करण्याची मागणी आपण करणार आहोत, असेही कोकाटे म्हणाले.
