fbpx
Monday, June 17, 2024
BusinessPUNE

ऑटो रिक्षाचाकांच्या मुलांसाठी पियाजिओने केली ‘शिक्षा से समृद्धी’ या शिष्यवृत्तीची घोषणा

पुणे, ३० – : अवघा देश महात्मा गांधींची १५१वी जयंती साजरी करण्याच्या तयारीत गुंतला असताना, पियाजिओ व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेड ‘शिक्षा से समृद्धी’ ही आपली अनोखी शिष्यवृत्ती योजना साभिमान सादर करत आहे. ऑटोरिक्षा चालकांच्या दहावी किंवा बारावीनंतर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणा-या मुलांना मदत करण्यासाठी ही योजना आणली गेली असून आपल्या सीएसआर उपक्रमाचा भाग म्हणून ही शिष्यवृत्ती देण्यासाठी पियाजिओ व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेडने बडीफॉरस्टडी इंडिया फाउंडेशनशी (Buddy4Study India Foundation) हातमिळवणी केली आहे. या उपक्रमांतर्गत १०वी/१२वी नंतर पूर्ण वेळ तांत्रिक किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या निवडक विद्यार्थ्यांच्या वार्षिक फी पैकी ८०% पर्यंतची फी भरली जाणार आहे. 

ज्यांना स्वत:ला आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण घेता आले नाही अशा वंचित समाजातील ऑटोरिक्षाचालकांच्या मुलांच्या सक्षमीकरणाचे लक्ष्य समोर ठेवून या कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीमुळे पात्र विद्यार्थ्यांच्या आर्थिक गरजांची काळजी घेतली जाईल. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दहावी किंवा बारावीमध्ये ५५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविले असणे आवश्यक आहे, तसेच त्यांनी आयटीआय किंवा पॉलिटेक्निक सारख्या पूर्णवेळ तांत्रिक किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेला असावा व त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ३,००,००० हून कमी असावे. निवडक विद्यार्थ्यांना वार्षिक फी किंवा वर्षाकाळी जास्तीत-जास्त २०,००० रुपयांच्या रकमेवर ८०% इतक्या मूल्याची शिष्यवृत्ती मिळेल.

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक (180-012-05577) आणि वेबलिंक https://www.buddy4study.com/page/piaggio-shiksha-se-samriddhi-scholarship च्या माध्यमातून एक विशेष टेली काउन्सिलिंग सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. वेबलिंक आणि हेल्पलाइन क्रमांक या दोन्ही सुविधा २ ऑक्टोबर २०२० पासून सुरू होतील. या उपक्रमाची माहिती व्यापक आउटरीच कार्यक्रमांच्या माध्यमातून केंद्रीय स्तरावरून तीनचाकी चालकांच्या समुदायापर्यंत पोहोचवली जाईल, तसेच प्रत्येक पियाजिओ कमर्शियल डीलरशीपमध्येही याची माहिती मिळेल. ऑफलाइन फॉर्म्सचे वितरण व स्वीकारही पीव्हीपीएलच्या सर्व डीलरशीप्समध्ये केला जाईल.

अर्जामध्ये भरलेली माहिती पडताळण्यासाठी व शिष्यवृत्तीसाठी सर्वार्थाने सुयोग्य विद्यार्थी निवडले जावेत यासाठी सर्व पात्र विद्यार्थ्यांची टेलिफोनवरून मुलाखत घेतली जाईल. विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाल्यानंतर एक स्वतंत्र ऑनबोर्डिंग अॅक्टिव्हिटी पार पाडली जाईल व विशिष्ट काळासाठी या विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर देखरेख ठेवली जाईल.

या घोषणेबद्दल बोलताना, पियाजिओ व्हेइकल्स प्रा. लि. चे चेअरमन आणि एमडी दिएगो ग्राफी म्हणाले, “भारतात अनेक पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक स्त्रोतांच्या तसेच संस्थात्मक आधाराच्या अभावी शिक्षण सोडून द्यावे लागते. कोव्हिड-१९ मुळे ही समस्या अधिकच बिकट झाली आहे. ऑटोरिक्षाचालकांबरोबर जवळून काम केले असल्याने व यासंदर्भातील त्यांचे प्रश्न जवळून पाहिले असल्याने पीव्हीपीएलने ऑटोरिक्षाचालकांच्या मुलांना त्यांची शैक्षणिक स्वप्ने साध्य करण्याची संधी देत त्यांच्या कुटुंबांना मदत देण्याचा हा प्रयत्न केला आहे. पियाजिओने भारतातील एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्हणून नेहमीच आपले कर्तव्य बजावले आहे व या कार्यक्रमामुळे भारतातील ऑटोचालकांच्या समुदायाची स्थिती सुधारण्याप्रती असलेली आमची बांधिलकी अधिकच दृढ झाली आहे.’’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading