‘लॉकडाऊन’मुळे कंटाळलेल्या ज्येष्ठांमध्ये नवचैतन्य जागवणारा अनोखा हास्ययोग

पुणे : कोरोनामुळे सर्वाधिक बंधने आली ती, ज्येष्ठ नागरिकांवर. उद्याने, बागा, वॉकिंग प्लाझा सगळेच बंद आहे. शिवाय, त्यांना कोरोनाचा अधिक धोका असल्याने ‘अनलॉक’मध्येही बाहेर न पडण्याचा सल्ला आहे. अशावेळी 24 तास घरात बसून त्यांची घुसमट होतेय. ना मनोरंजन, ना गाठीभेटी, ना व्यायाम, ना हास्यविनोद अशा अवस्थेत कंटाळलेल्या या ज्येष्ठ नागरिकांमध्ये चैतन्य जागविण्याचे काम नवचैतन्य हास्ययोग परिवाराने केले आहे. पत्रकार परिषदेत नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विश्वस्त मकरंद टिल्लू यांनी ही माहिती दिली. प्रसंगी प्रमोद ढेपे, विजय भोसले आदी उपस्थित होते.

लॉकडाऊनच्या काळात या ज्येष्ठ नागरिकांना नवचैतन्य हास्ययोग परिवाराने जोडून घेतले आहे. नव्या तंत्रज्ञानाशी सांगड घालत त्यांच्यासाठी ऑनलाईन योग-प्राणायाम आणि हास्ययोग वर्ग चालवले जात आहेत. आज जवळपास 2000 ज्येष्ठांनी नोंदणी केली असून 1200 पेक्षा अधिक लोक रोज ऑनलाईन योग आणि हास्ययोग करण्यासाठी ऑनलाईन उपस्थित असतात.  संस्थेतर्फे आयोजित ‘लाईव्ह’ कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहून हजारो लोक उल्हसित होत आहेत. आपला वेळ चांगल्या गोष्टीत घालवत आहेत.

हास्यक्लबची सुरुवात पुण्यात 23 वर्षांपूर्वी विठ्ठल काटे सर आणि सुमनताई काटे यांच्या पुढाकारातून झाली. आज या परिवारात 180 हास्यक्लब आहेत, तर 15000 पेक्षा जास्त सभासद आहेत. ऑनलाईन हास्ययोगात जोडल्या गेलेल्या ज्येष्ठांना 84 वर्षीय विठ्ठल काटे शारीरिक हालचाली, व्यायाम, प्राणायाम शिकवतात. तर परिवाराचे विश्वस्त व हास्ययोगाचे प्रशिक्षक मकरंद टिल्लू मनाचे हास्ययोग, व्यायाम, , सकारात्मक दृष्टिकोन, तांत्रिक ज्ञान शिकवतात. संस्थेचे विश्वस्त या उपक्रमाच्या प्रसाराचे कार्य करत आहेत. या उपक्रमाचे प्रमुख मकरंद टिल्लू यांनी ज्येष्ठांच्या हास्ययोगासाठी  खास स्टुडिओचा सेटअप लावला आहे. ज्येष्ठांना ऑनलाईन कार्यशाळेत सहभागी होताना घ्यावयाची काळजी, कॅमेरा अँगल, फ्रेम, स्पीकर चालू-बंद करणे अशा बारीकसारीक गोष्टी शिकवल्या जात आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाशी दुरावा ठेवणारी ही पिढी ‘टेक्नोसॅव्ही’ झाल्याचे पहायला मिळत आहे.

याबाबत बोलताना मकरंद टिल्लू म्हणाले, “लॉकडाऊनमुळे सगळेच व्यवहार, कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे ज्येष्ठांची मोठी कोंडी झाली आहे. विरंगुळा केंद्रे, उद्याने बंद असल्याने त्यांना घरात बसून कंटाळा येत आहे. अशावेळी नवचैतन्य हास्ययोग परिवाराने ऑनलाईन कार्यक्रम घेण्याची कल्पना अंमलात आणली. यंदा कोरोनामुळे वसंत व्याख्यानमालाही झाली नाही.  ज्येष्ठांचा त्यातील सहभाग मोठा असतो. त्यामुळे आम्ही व्याख्यानमाला घेतली. अतिशय चांगली व्याख्याने झाली आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. जागतिक हास्य दिनही यावेळी ऑनलाईन केला. हा कार्यक्रम 10 हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिला, ही आम्हाला सुखावणारी बाब होती. नियमित व्यायामाने ज्येठांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले होते आहे. सुरुवातीला मोबाईल, लॅपटॉप हाताळना ज्येष्ठांना अडचणी यायच्या. मात्र, त्याबाबतही आम्ही नियमितपणे मार्गदर्शन केले. आज अनेक ज्येष्ठ या ऑनलाईन वर्गांना सरावले आहेत.”
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे सर म्हणाले ” सुंदर पुणे, हसरे पुणे करण्यासाठी आम्ही कार्य करत आहोत. जागतिक योगदिन, कलाकारांच्या मुलाखती, गुरू पौर्णिमा असे विविध उपक्रम सातत्याने होत असल्याने, ज्येष्ठांचा एकटेपणा कमी होतो आहे. आता फक्त पुण्यातूनच नव्हे तर नासिक, सांगली, नागपूर, सोलापूर, चंदिगढ, ऑस्ट्रेलिया अशा विविध ठिकाणाहून ज्येष्ठ दररोज सकाळी आरोग्य चळवळीत सामील होत आहेत.”

Leave a Reply

%d bloggers like this: