“माझे कुटुंब-माझी जबाबदारी” मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासन सज्ज

राज्यात सध्या कोविड बाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ट्रेस, ट्रॅक , ट्रीट या त्रिसूत्रीचा वापर करुन कोविडचा प्रार्दूभाव आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.  राज्याच्या शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये कोविड-१९ ची रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.

त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहीम संपूर्ण राज्यात दिनांक १५ सप्टेंबर २०२० पासून राबविण्यास सुरुवात झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी मोहीम” ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शहरी व ग्रामीण भागात ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यात २ लाख २८ हजार १२३ घरातील कुटुंबांची तपासणी करण्यासाठी ५९५ पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकासाठी एक हजार ७८५ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक ५ ते १० पथकासाठी एक वैद्यकीय अधिकारी याप्रमाणे उपचारासाठी ३७ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच संदर्भ सेवेसाठी २९ रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच या आरोग्य पथकांना योग्य प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला आहे.

कोविड-१९ नियंत्रणासाठी तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” कोविड मुक्त महाराष्ट्र या मोहिमेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

“माझे कटुंब-माझी जबाबदारी”  या मोहिमेअंतर्गत राज्यातील शहर, गाव, पाडे-वस्त्या, तांडे यातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी, कोमॉर्बीड आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकास व्यक्तीश: भेटून आरोग्य शिक्षण दिले जाणार आहे. ही मोहिम १५ सप्टेंबर, २०२० ते २५ ऑक्टोंबर, २०२० या कालावधीमध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

या मोहिम कालावधीमध्ये गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार केली आहेत. एका पथकामध्ये १ आरोग्य कर्मचारी आणि २ स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेले स्वयंसेवक असतील. एक पथक दररोज ५० घरांना भेटी देईल. भेटी दरम्यान घरातील सर्व सदस्यांचे तापमान Sp०२ तपासणे तसेच कोमॉर्बीड कंडिशन (Comorbid Condition) आहे का याची माहिती घेण्यात येत आहे.

ताप, खोकला, दम लागणे, Sp०२ कमी अशी कोविडसदृष्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना जवळच्या फिव्हर क्लिनिक (Fever Clinic) मध्ये संदर्भीत करण्यात येत आहेत. फिव्हर क्लिनिक (Fever Clinic) मध्ये कोविड-१९ प्रयोगशाळा चाचणी करुन पुढील उपचार केले जातील. कोमॉर्बीड Condition असणारे रुग्ण नियमित उपचार घेतात का याची खात्री केली जाईल आणि आवश्यक तेथे औषधे व तपासणीसाठी संदर्भीत केले जात आहे.

प्रत्येक ५ ते १० पथकांमागे एक डॉक्टर उपचार व संदर्भ सेवा देईल. घरातील सर्व सदस्यांना व्यक्तीश: प्री कोविड, कोवीड आणि पोस्ट कोवीड परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समजावून सांगितले जात असून यासाठी लोकप्रतिनिधी व खाजगी रुग्णालय, स्वयंसेविका यांचा सहभाग घेतला जात आहे.

“माझे कुटुंब-माझी जबाबदारी” ही मोहिम कोविड-१९ साथ नियंत्रणासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे जिल्ह्यात या मोहिमेची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी आणि सर्व संशयित कोविड-19 रुग्ण आणि कोमॉर्बीड व्यक्तींना तपासणी, चाचणी व उपचार या सेवा मिळण्यासाठी दक्षता घेतली जात आहे.

मोहिमेचे उद्दिष्ट :

१)गृहभेटीद्वारे संशयित कोविड तपासणी व उपचार. २) त्यांना उपचार व कोविड-१९प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण. ३) सारी / इली (SARI / ILI)  रुग्णांचे गृहभेटीद्वारे सर्वेक्षण, कोविड-१९ तपासणी आणि उपचार. ४) गृहभेटीद्वारे प्रत्येक नागरिकांचे कोविड-१९ बाबत आरोग्य शिक्षण.

मोहिमेची व्याप्ती :

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, कटक मंडळ इ. ठिकाणी राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील सर्व शहरे, गावे, वाडी, तांडे, पाडे इ. मध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.

माझे कुटुंब – माझी जबाबदारी मोहीम अंमलबजावणी :

गृहभेटीसाठी एक आरोग्य कर्मचारी आणि २ स्वयंसेवक (एक पुरुष व एक स्त्री) असे तिघांचे पथक असेल. एक पथक १ दिवसात ५० घरांना भेटी देईल. पहिली फेरी १५ दिवस असे गृहीत धरुन संपूर्ण लोकसंख्येसाठी एकूण पथकांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. उदा. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांची लोकसंख्या ५० हजार असेल तर या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यकक्षेत १० हजार घरे असतील. एकूण १५ दिवस गृहभेटी द्यावयाच्या झाल्यास दररोज सरासरी ६५० घरांना भेटी द्याव्या लागतील. यासाठी १३ टीम आवश्यक आहेत. ग्रामीण भागासाठी ३० हजार लोकसंख्येच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये साधारणत: ६ हजार कुटुंबे असतील एकूण १५ दिवस गृहभेटी द्यावयाच्या झाल्यास दररोज सरासरी ४०० घरांना भेटी द्याव्या लागतील. यासाठी ८ पथके स्थापन करावी लागतील. हे गणित लक्षात घेऊन प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आले आहे.

एकूण पथकांची संख्या आणि स्वयंसेवक ठरल्यानंतर ग्रामीण भागामध्ये प्रत्येक पथकास लोकसंख्येनुसार गाव‍ निश्चित करुन दिलेल्या तक्त्यामध्ये नियोजन करतील. शहरी भागामध्ये पथकाचे दैनंदिन सर्वेक्षणासाठीचा भाग निश्चित करताना गल्ली, रस्ता, घर नंबर यावरुन निश्चिती केली जाईल.

पथकाचे स्वरुप :

पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी किंवा आशा आणि २ स्थानिक स्वयंसेवक ( १ पुरुष व १ स्त्री) असतील. हे स्वयंसेवक स्थानिक सरपंच, नगरसेवक यांच्या सहाय्याने निश्चित केले जातील. पथकातील सदस्यांना कोरोना दूत असे संबोधण्यात येईल.

सरपंच, नगरसेवक यांच्याकडून स्वयंसेवक प्राप्त न झाल्यास त्याऐवजी एक आरोग्य कर्मचारी, आशा असेल. अशावेळी पथकात २ आरोग्य कर्मचारी, आशा असतील.

नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामीण भाग यामध्ये खालील पैकी आरोग्य कर्मचारी सर्वेक्षणासाठी घेण्यात येतील. बहुविध आरोग्य सेविका (स्त्री) (ए.एन.एम.), बहुविध आरोग्य सेवक (पुरुष) (आरोग्य सेवक), आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती (आवश्यकतेनुसार महिला व बाल कल्याण विभागांची परवानगी घेऊन), किमान 10 वी पास कोविड दूत (स्वयंसेवक). प्रत्येक पथकात १ पुरुष व १ स्त्री, प्रत्येक ५ ते १० पथकामागे १ डॉक्टर वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य पथक किंवा समुदाय आरोग्य अधिकारी असतील.

गृहभेटी – पहिली फेरी :

प्रत्येक घरात शिरण्यापूर्वी दाराबाहेर सोयीच्या ठिकाणी स्टिकर लावले जातील. घरामध्ये गेल्यानंतर प्रत्येक सदस्याची ॲपमध्ये नोंद घेतली जाईल आणि त्यानंतर Infrared Thermometer ने तापमान Pulse Oxymeter ने SpO2 मोजले जाईल.

ताप असलेली व्यक्ती आढळल्यास (तापमान 98.6 F) अशा व्यक्तीस खोकला, घशात दुखणे, थकवा इ. लक्षणे आहेत का याची माहिती घेतली जाईल.

घरातील प्रत्येकास मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनी आजार, अवयव प्रत्यारोपण, दमा इ. आजार आहेत का याबाबत विचारणा करुन ॲपमध्ये माहिती नोंदविली जाईल.

ही माहिती ताप 100.4 अंश फॅरनहाईट (38 सी) इतका किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास किंवा SpO2  95 टक्के पेक्षा कमी असल्यास रुग्णांस जवळच्या फिव्हर क्लिनिक (Fever Clinic) मध्ये संदर्भित केले जाईल.

रुग्णांस SARI / ILI लक्षणे असल्यास फिव्हर क्लिनिक (Fever Clinic) मध्ये संदर्भीत केले जाईल.

संदर्भीत करतांना रुग्णास संदर्भ चिठ्ठी देवून तसेच कोविड-19 प्रतिबंधाचे सर्व संदेश रुग्ण व घरातील सर्व नातेवाईकांना समजावून सांगण्यात येतील.

घरातील कोणत्याही व्यक्तीस मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी आजार, Organ transplant, लठ्ठपणा, दमा किंवा इतर मोठे आजार असल्यास त्यांची SpO2 तपासणी पुन्हा करुन खात्री करतील. अशा रुग्णांचे तापमान 98.7 F (37.C)  पेक्षा जास्त असेल आणि 100.4 F पेक्षा कमी असेल तरी सुद्धा त्यांना Fever Treatment Center येथे संदर्भीत केले जाईल.

 ताप (SpO2) 95 पेक्षा कमी, Co-morbid Condition या तीन पैकी कोणतेही 2 लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तीस High risk संबोधून त्वरित रुग्णवाहिका बोलावून जवळच्या Fever Treatment Center / Covid Care Center  ला संदर्भीत केले जाईल.

गृहभेटी- दुसरी फेरी :

कुटुंबातील सदस्यांची माहिती पहिल्या फेरीत घेतलेली असल्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये दररोज 75-100 घरे करतील. दुसऱ्या फेरीमध्ये सर्वांचे तापमान व SpO2 मोजून दरम्यानच्या काळात घरातील कोणाला मोठा आजार होऊन गेला काय याची खात्री केली जाईल.

पुन्हा एकवेळा आरोग्य संदेश दिले जातील. ताप 100.4 फॅरनहरिट (38.C) किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास आणि हे SpO2 94 टक्के पेक्षा कमी असल्यास रुग्णास जवळच्या फेवर क्लिनिकमध्ये संदर्भीत करतील. पहिल्या फेरीच्या वेळी गैरहजर असणाऱ्या घरातील व्यक्तींची Co-morbid Condition साठी चौकशी करतील.

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची बक्षिस योजना :

बक्षीस योजना व्यक्ती आणि संस्थांसाठी असतील. व्यक्तींसाठीच्या योजनांमध्ये निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, आरोग्य शिक्षण मेसेजेसच्या स्पर्धा इ. घेण्यात येतील तर संस्थांसाठी वेगवेगळ्या संस्थांच्या कामकाजानुसार बक्षीस योजना देण्यात येईल.

बक्षीस योजनेची माहिती राज्यस्तरावरुन वृत्तपत्राद्वारे दिली जाणार आहे. त्यामध्ये वैयक्तिक बक्षिसासाठीचे साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याबाबत कळविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी एक अधिकारी निश्चित करतील.

आलेले साहित्य तपासून त्यांना गुणानुक्रमांक देण्यासाठी जिल्हाधिकारी हे स्थानिक स्तरावर एक समिती नेमतील व त्या समितीच्या प्रमुखाने गुणानुक्रमांक निश्चित करतील.

व्यक्तींसाठीच्या बक्षिस योजनेत विद्यार्थी, पालक, सामान्य व्यक्ती यांच्यासाठी या योजना लागू असतील. राज्यस्तरावर वृत्तपत्रांमध्ये आणि दूरचित्रवाणीवरुन जनतेला सहभागासाठी आवाहन करण्यात येईल.

प्राप्त झालेले निबंध, पोस्टर्स, मेसेजेस, शॉर्ट फील्म या अनुभवी परिक्षकांकडून तपासले जातील. बक्षिस मिळालेला निबंध, पोस्टर्स, फील्मस इ. ना राज्य शासनातर्फे प्रसिद्धी देण्यात येईल. विजेत्यांना ढाल आणि खालीलप्रमाणे बक्षीस देण्यात येईल.

पहिले बक्षीस :- राज्यस्तर 10 हजार, जिल्हास्तर व महानगरपालिकास्तर 5 हजार, आमदार मतदार संघ स्तर 3 हजार.

दुसरे बक्षीस :- राज्यस्तर 5 हजार, जिल्हास्तर व महानगरपालिकास्तर 3 हजार, आमदार मतदार संघ स्तर 2 हजार.

तिसरे बक्षीस :- राज्यस्तर 3 हजार, जिल्हास्तर व महानगरपालिकास्तर 2 हजार, आमदार मतदार संघ स्तर 1 हजार असे राहील.

जिल्हास्तरावर नागरी आणि ग्रामीण असे दोन विभाग असतील प्रत्येक विभागात प्रथम तीन संस्था निवडण्यात येतील व त्यांना बक्षिसे दिले जातील.

संस्थेचा गुणानुक्रम काढण्यासाठी निकष :

मोहिम पहिल्या फेरीमधील गृहभेटीचे प्रमाण (10 गुण). प्रती हजार लोकसंख्येमध्ये कोविड-19 चाचणी (मोहिम कालावधीमध्ये) प्रमाण (30 गुण). सीएसआर अंतर्गत किती मास्क व हात धुण्यासाठी साबण वाटप केले प्रति हजार लोकसंख्या (20 गुण). किती SARI / ILI रुग्ण प्रती हजार लोकसंख्येत शोधून त्यांची चाचणी केली (10 गुण). कोविड-19 मृत्यू प्रमाण (30 गुण) याप्रमाणे निकष असतील.

मिळालेल्या गुणांनुसार ग्रामपंचायत, वार्डातील हिरवे (75 टक्के प्लस) पिवळे (41-74 टक्के) लाल (41 टक्के पेक्षा कमी) कार्ड देण्यात येईल.

हिरवे कार्ड दिलेल्या संस्थांना ढाल आणि खालीलप्रमाणे बक्षिसे देण्यात येतील.

पहिले बक्षिस :- राज्यस्तर एक लाख, जिल्हास्तर व महानगरपालिकास्तर 50 हजार, आमदार मतदार संघ स्तर 10 हजार.

दुसरे बक्षिस :- राज्यस्तर 50 हजार, जिल्हास्तर व महानगरपालिकास्तर 30 हजार, आमदार मतदार संघ स्तर 5 हजार.

तिसरे बक्षिस :- राज्यस्तर 30 हजार, जिल्हास्तर व महानगरपालिकास्तर 20 हजार, आमदार मतदार संघ स्तर 3 हजार राहील.

 बक्षीस मिळालेल्या संस्थांना जिल्हा आणि राज्य स्तरावर समारंभ आयोजित करुन जिल्हा स्तरावर मा. पालकमंत्री यांच्या हस्ते आणि राज्य स्तरावर मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते बक्षिसे वितरण करण्यात येतील.

 माझे कुटुंब – माझी जबाबदारी या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या आरोग्य पथकांना योग्य ते सहकार्य करावे आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची माहिती सांगावी. तसेच आरोग्य पथकाकडून देण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक माहितीनुसार कार्यवाही करावी. जेणेकरुन कोविड-19 चा प्रसार थांबवून हिंगोली जिल्हा कोरोना मुक्त होईल यासाठी या मोहिमेत सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

अरुण सुर्यवंशी

जिल्हा माहिती अधिकारी

हिंगोली

Leave a Reply

%d bloggers like this: