Wednesday, June 17, 2026
MAHARASHTRA

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मानवतमध्ये कपडेफाड आंदोलन

परभणी, दि. 23 – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मानवत येथील सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी (दि.23) सकाळी तहसील कार्यालयासमोर कपडेफाड आंदोलन करीत शासनाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.
मानवत येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 19 सप्टेंबरपासून सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनातून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करीत जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यत आंदोलने चालूच राहतील असाही इशारा येथील समाजबांधवांनी दिला आहे.

प्रशासनास दिलेल्या निवेदनात, मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याबाबत राज्य सरकारने अंतरिम स्थगिती उठविण्याकरिता सर्वतोपरी न्यायालयीन लढाईसाठी योग्य ते प्रयत्न करावेत, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून आरक्षण मर्यादा वाढवावी व लोकसभेत सरसकट मराठा आरक्षणाला आरक्षण मिळण्याकरिता ठराव पास करावा, सरसकट मराठा समाजास ओबीसी संवर्गामध्ये समावेश करावा, मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत राज्य सरकारने सर्व प्रकारची नोकरभरती बंद ठेवावी आदी विविध मागण्यासांठी समाजबांधव आंदोलन करत आहेत. मानवत येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला असून बुधवारी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयासमोर कपडेफाड आंदोलन करण्यात आले. यापूर्वी मानवत येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मुंडण आंदोलन करण्यात आले. नगर पालिकेसमोर हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर नगर पालिकेपासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पायी रॅली काढून राज्य सरकारचा निषेध नोंदवला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading