पुणेकरांना अनुभवता येणार सात पिढ्यांची कलेची परंपरा
पुणे : सात पिढ्यांपासून जपलेली चर्मबाहुल्यांची कला, तर कुठे लाकडावर केलेली नजाकतदार कोरीव कामे… भारताच्या समृद्ध हस्तकला परंपरेचा हा अनोखा आविष्कार पुण्यातील कारागीर बाजार मध्ये पाहायला मिळत आहे. दिवाळीनिमित्त आयोजित या बाजारात देशभरातील कारागिरांनी आपल्या पारंपरिक कलाकृती सादर केल्या आहेत. ‘क्राफ्ट अँड आर्टिसन रिव्हायव्हल एलएलपीतर्फे कारागीर बाजार उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. येत्या १ नोव्हेंबरपर्यंत बंडगार्डन येथील ऐतिहासिक डच पॅलेसमध्ये हा दहा दिवसीय उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. देशातील २६ हून अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील २५० हून अधिक अधिक कलाकारांची कलाकुसर पाहण्याची संधी या निमित्ताने पुणेकरांना .मिळणार आहे.
आंध्र प्रदेशातील सिंधे महेश हे या प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण ठरले आहेत. त्यांच्या कुटुंबात सात पिढ्यांपासून चर्मबाहुल्या तयार करण्याची परंपरा आहे. २००२ मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या महेश यांना २०१६ मध्ये पारंपरिक कला व हस्तकलेतील योगदानासाठी डॉक्टरेट ऑफ लिटरेचर ही पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या ‘लक्ष्मी भूषण लेदर पपेट्स’ या दालनात रामायणातील प्रसंगांवर आधारित रंगीबेरंगी चर्मबाहुल्या आणि चित्रे पाहायला मिळतात. हरियाणातील लाकूड कोरीव काम करणारे सूर्यकांत बोंडवाल हेही या उपक्रमाचे विशेष आकर्षण आहे. त्यांच्या कुटुंबाला हस्तकलेतील योगदानासाठी राष्ट्रीय पुरस्कारांसह विविध सन्मान मिळाले आहेत. २०१५ मध्ये त्यांना ‘शिल्पगुरू’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
पारंपरिक कलेमागील कौशल्य, सांस्कृतिक वारसा आणि पिढ्यान्पिढ्या जपलेले ज्ञान यांची ओळख करून देणे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. आधुनिकतेच्या प्रवाहात भारतीय हस्तकलेचा वारसा जपणाऱ्या कारागिरांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा हा एक प्रयत्न आहे.
