काळी आई वाचवायला हवी ; तरच पुढची पिढी टिकेल – पद्मश्री राहीबाई पोपेरे
पुणे : मी निसर्गाची आणि मातीची शाळा शिकले. गरीबी आली तरी लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये, हे मला वडिलांनी शिकविले. ती शिकवण मी लक्षात ठेवली. जे दिसायला चांगले आहे, ते आरोग्याला घातक आहे. आज आपण सगळे आरोग्याला घातक असलेले खात आहोत. त्यामुळे चारच भाज्या खा, पण आपले आरोग्य चांगले ठेवा. प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त भाजी जायला हवी. काळी आई अन्न देते, ती आपण वाचवायला हवी. तरच पुढची पिढी टिकेल, असे मत पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केले.
न-हे मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् च्या १३ व्या वर्धापनदिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ संपादक विजय बाविस्कर, संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यंदाचा जीवनगौरव पुरस्कार माजी खासदार, समाजसेवक प्रा. जोगेंद्र कवाडे यांना प्रदान करण्यात आला. तसेच पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना कृषी क्षेत्रातील पुरस्कार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे चे अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांना शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार, सिने अभिनेता मिलिंद शिंदे यांना कला क्षेत्रातील पुरस्कार, पुणे अर्बन को-आॅप बँकेचे अध्यक्ष निलेश ढमढेरे यांना सहकार क्षेत्रातील पुरस्कार आणि समाज प्रबोधन चॅरिटेबल ट्रस्टचे जयंत हिरे यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल असे पुरस्काराचे स्वरुप होते.
जोगेंद्र कवाडे म्हणाले, जो संकटाशी दोन हात करण्याची तयारी ठेवतो, न डगमगता त्यावर मात करतो, त्याला कोणीही अडवू शकत नाही. शिस्त, समर्पण आणि दृढ निश्चय या तीन गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवा. शिक्षक होणे ही साधी गोष्ट नाही. प्रत्येकाला वाटते माझा मुलगा डॉक्टर, इंजिनिअर झाला पाहिजे. पण निर्मिती करणारा शिक्षक व्हावे, हे कोणाला वाटत नाही. शिक्षक म्हणजे शिल्पकार असतो. घडविण्याची प्रक्रिया सोपी नाही.
औदुंबर उकिरडे म्हणाले, ग्रामीण भागातील माणसाने ठरवले तर तो काय करू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रा. डॉ. सुधाकरराव जाधवर आहेत. गोरगरीबांची मुले शिकली पाहिजेत आणि त्यांनी जीवनात पुढे गेले पाहिजे, या उद्देशाने आजही शिक्षण संस्था कार्यरत आहे, असेही त्यांनी सांगितले.
निलेश ढमढेरे म्हणाले, ज्या राज्यांमध्ये सहकार क्षेत्राचा विकास झाला, ती राज्ये आज प्रगतीपथावर आहेत. सहकारी बँकांच्या माध्यमातून समाजातील लोकांना काम करण्याची आणि पुढे जाण्याची संधी मिळायला हवी. समाजातील लोकांच्या आर्थिक गरजा भागविण्याचे महत्त्वपूर्ण काम सहकारी बँकांच्या माध्यमातून होते, असेही ते म्हणाले.
जयंत हिरे म्हणाले, समाजसेवा म्हणजे केवळ मदत करणे नव्हे, तर लोकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणे होय. आपण किती मोठे झालो, यापेक्षा किती जणांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला, हे अधिक महत्त्वाचे आहे.
ॲड. शार्दुल जाधवर म्हणाले, समाजाला आपण काय देऊ शकतो, याचा अहोरात्र विचार करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान आज करण्यात आले. बल, बुद्धी आणि सद्विचारांतून शिक्षण या दृष्टिकोनातून संस्थेची तेरा वर्षांची वाटचाल सुरू आहे. ज्या भागात चौथीनंतर शिक्षणाची सुविधा नव्हती, अशा ठिकाणी प्रा. डॉ. सुधाकर जाधवर यांनी शाळा सुरू केली. आज या शाळेचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील असते.
अग्निशमन दल, पोलीस, पत्रकार, सैन्यदल आणि रुग्णवाहिका चालकांच्या मुलांना केजी ते पीजी पर्यंतच्या शैक्षणिक शुल्कात २५ टक्के सवलत तसेच ८५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांनी संस्थेत प्रवेश घेतल्यास शैक्षणिक शुल्कात १५ टक्के सवलत शिष्यवृत्ती पत्र यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
