Wednesday, September 2, 2026
MAHARASHTRA

ऑक्सिजन पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन नियोजन करावे – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

मुंबई, दि. २२ : कोरोना रुग्णांसह इतर रुग्णांना उपचारासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची भविष्यातील गरज लक्षात घेऊन उत्पादन वाढवावे. तसेच इतर व्यावसायिक कारणांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजन पुरवठा व वैद्यकीय कारणांसाठी लागणारे ऑक्सिजन याच्या वितरणाचे योग्य नियोजन करावे. असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात  त्यांनी आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव सौरव विजय, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अरुण उन्हाळे, सहआयुक्त (दक्षता) सुनिल भारद्वाज यांच्यासह ऑक्सिजन उत्पादक व पुरवठादार उपस्थित होते.

राज्यातील कोविड-१९ च्या ११ टक्के रुग्णांच्या उपचारासाठी  ऑक्सिजनची आवश्यकता भासते. इतर रुग्णांना लागणारे ऑक्सिजन मिळून सुमारे ८०० मेट्रिक टन एवढे ऑक्सिजन लागते. सध्या  एक हजार मे.टन पेक्षा जास्त ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा येऊ नये, मात्र वाहतूक व वितरण व्यवस्थेतील अडचणीमुळे काही ठिकाणी ऑक्सिजन मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सर्व पुरवठादार आणि वाहतूकदार यांनी वितरणाचे जाळे वाढवून योग्य सहकार्य करुन गरजुंपर्यंत ऑक्सिजन पोहचेल याची खबरदारी घ्यावी. या कामात काही अडचण असल्यास अडचण दूर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

येत्या काळात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवुन उत्पादकांनी त्यांचे उत्पादन कसे वाढविता येईल याबाबत नियोजन करावे तसेच योग्य वितरण प्रणाली राबविण्यात यावी. राज्यातील ऑक्सिजन टँकर व्यतिरिक्त इतर गॅसेससाठी वापरले जाणारे टँकर सुध्दा ऑक्सिजन वाहतूकीसाठी वापरण्याचे  निर्देश डॉ. शिंगणे यांनी दिले .

नियंत्रणासाठी विशेष कंट्रोल रुम

कोविड-१९ चा प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजनांसाठी अन्न व औषध पुरवठा विभागाने विशेष कंट्रोल रुम स्थापन केली आहे. याद्वारे ऑक्सिजन पुरवठ्याच्या नियंत्रणासह आता रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी आणि पुरवठा नियंत्रित केली जाणार आहे.  राज्यात कोणत्याही जिल्ह्यात ऑक्सिजनची आवश्यकता असल्यास त्या जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक हे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत मागणी नोंदवितात. जवळच्या पुरवठादाराकडून ऑक्सिजन तातडीने त्या जिल्ह्याला  उपलब्ध करुन दिला जातो. या कंट्रोल रुम मध्ये अन्न व औषध प्रशासन विभागासह आरोग्य विभाग आणि उद्योग विभागाचे संबधित अधिकारी समन्वय साधत असतात. यासाठी टोल फ्री क्रमांक १८ ०० २२२ ३६५ तसेच ०२२ २६५९२३६४ हा लॅण्डलाईन क्रमांक कार्यान्वित आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading