fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

नवीन शैक्षणिक वर्ष स्वागतार्ह – डॉ. संजय चोरडिया


पुणे : कोरोनामुळे लांबलेले यंदाचे नवीन शैक्षणिक वर्ष नोव्हेंबर ते ऑगस्ट असे करण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाचा निर्णय स्वागतार्ह आहे. २०१९-२० या वर्षांच्या लांबलेल्या पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा यामुळे प्रथम वर्षाचे वर्ग कधी चालू होणार, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र, आयोगाने १८ नोव्हेंबरपासून प्रथम वर्षाचे वर्ग चालू होतील, असे सांगत शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांसह शैक्षणिक संस्था आणि पालकांनाही दिलासा मिळाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशी प्रतिक्रिया सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी दिली.
कोरोनामुळे अभियांत्रिकीसह वैद्यकीय आणि इतर शाखांच्या परीक्षा खोळंबल्या होत्या. शिवाय सर्वच शाखांचे प्रथम वर्षाचे प्रवेश अडकले होते. आता या सर्व परीक्षा ऑक्टोबरअखेरपर्यंत संपणार असून, त्याचे निकालही लगेच जाहीर होणार आहेत. त्यामुळे नवीन वर्ष नोव्हेंबरपासून सुरु होते आहे. गेल्या चार-पाच महिन्यात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाचे धडे गिरवले आहेत. त्यामुळे यूजीसीने केलेल्या ऑनलाईन-ऑफलाईन शिक्षणाच्या संबंधीच्या सूचनांचे पालन होईल. आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि शिकवण्याच्या नव्या पद्धती वापरल्या जातील. दुर्गम भागात इंटरनेट पोहोचत नसल्याने ऑनलाईन शिक्षणात व्यत्यय येतो आहे. अशावेळी तिथे त्या सुविधा पोहोचवण्यावर भर द्यावा लागणार आहे.
उन्हाळी शिबिरे आणि विविध उपक्रम यांना अभ्यासक्रमाशी जोडून घेऊन विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अनुभवांचे शिक्षण देण्यावर आपण भर द्यायला हवा. मुलांमध्ये स्वावलंबन, परिश्रम याचे बीज रुजवावे लागतील. संस्था आणि उद्योग यांनी एकत्रित येत विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे. १०-१५ मुलांमागे एका शिक्षकाने मेंटॉर म्हणून काम करावे व त्यांना प्रोत्साहित करावे. विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे नवीन शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल, असा विश्वास वाटत असल्याचे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading