कोरोना – 66 लाख ‘व्हाईट कॉलर’ नोकऱ्यांवर गदा

देशात बेरोजगारीचा उद्रेक झाला आहे. कोरोना महामारीमुळे मे ते ऑगस्ट या चार महिन्यांत तब्बल 66 लाखांहून अधिक व्हाईट कॉलर पेशाच्या लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. यात इंजीनिअर, फिजीशियन, शिक्षक, अकाऊंटंट आदींचा समावेश आहे. तसेच याच अवधीत जवळपास 50 लाख औद्योगिक कामगारांच्या नोकऱया गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) सर्वेक्षणातून बेरोजगारीचे हे भीषण वास्तव समोर आले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या देशव्यापी लॉकडाऊनने रोजगाराचे पुरते काट्टोळे केले आहे. इतर क्षेत्रांबरोबरच व्हाईट कॉलर नोकऱयांना 2016 नंतर सर्कात मोठी उतरती कळा लागली आहे. यात स्वयंरोजगार करणाऱयांचा समावेश केला गेलेला नाही. त्या लोकांची आकडेवारी जोडल्यास बेरोजगारीचा विस्फोट निदर्शनास येईल, असे सीएमआयईने म्हटले आहे. सीएमआयईच्या अहवालानुसार, मे ते ऑगस्ट 2019 या कालावधीत देशात 1 कोटी 88 लाख प्रोफेशनल लोक नोकरी करीत होते. कोरोना महामारीत 66 लाख नोकऱया गेल्याने ते प्रमाण 1 कोटी 22 लाखांवर ढेपाळले आहे. सन 2016 नंतरची व्हाईट कॉलर नोकऱयांतील ही सर्वात मोठी कपात आहे. यापाठोपाठ औद्योगिक कामगारांना मोठा फटका बसला असून त्यांच्या हातून जवळपास 26 टक्के नोकऱ्या गेल्या आहेत. या क्षेत्रात लघु उद्योगातील नोकऱयांवर सर्वाधिक गंडांतर आले आहे. गेल्या चार महिन्यांत जवळपास 50 लाख औद्योगिक कामगारांवर बेरोजगारीचे संकट कोसळल्याचे अहवालात नमूद केले आहे.

– कोरोनाचा लॉकडाऊन तसेच वाढलेला आर्थिक ताण यामुळे देशातील सर्वच क्षेत्रांतील नोकऱयांवर गंभीर परिणाम झाल्याचे सीएमआयईने याआधी म्हटले होते. एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत तब्बल 2 कोटी 10 लाख लोक बेरोजगार झाल्याचे सीएमआयईचे निरीक्षण आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: