‘युती करून चूक केली, १५० पेक्षा जास्त जागा जिंकलो असतो’ – देवेंद्र फडणवीस

मुंबई : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करून चूक केली, जर स्वतंत्र लढलो असतो तर १५० पेक्षा जास्त जागा आल्या असत्या, असा दावा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह कार्यक्रमात फडणवीस यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या भाकीताचा संदर्भ देत फडणवीस यांनी युती करून चूक केल्याची कबुली अप्रत्यक्षपणे दिली आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे. ‘ही पश्चातबुद्धी आहे, हे त्यांनी ठरवलं पाहिजे होतं, आता त्यांना सगळी गणितं सुचत आहेत, यावर आम्ही काय बोलणार?’, असं शिवसेना नेते अनिल परब म्हणाले आहेत. 

मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागांवर विजय मिळाला. भाजप आणि शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं असतानाही मुख्यमंत्रीपदावरुन या दोन्ही पक्षांनी फारकत घेतली. महाराष्ट्रात रंगलेल्या सत्ता नाट्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सगळ्यांना धक्का देत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण अवघ्या तीन दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. अखेर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी मिळून राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन केलं आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

Leave a Reply

%d bloggers like this: