मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन विषयी ….


भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला,पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता.त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. हैदराबाद संस्थान हे भौगोलिक दृष्टीने भारताच्या मध्यभागी असलेले भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. हैदराबाद संस्थानाची व्याप्ती १६ जिल्ह्यांची होती. हे १६ जिल्हे चार सुभ्यांमध्ये विभागले गेले होते. तेलगू भाषिकांचे दोन सुभे, कानडी भाषिकांचा एक सुभा व मराठी भाषिकांचा एक सुभा होता. मराठी भाषिकांच्या सुभ्याला मराठवाडा हे नाव होते. हैदराबादच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व मराठवाड्याने केले व या संग्रामात सर्वात जास्त हुतात्मे मराठवाड्यातील होते. भाषावार प्रांतरचनेचा आग्रही पुरस्कार करणारा मराठवाडा नेहमीच अखंड महाराष्ट्रवादी राहिला. हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते.त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता. हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या १ कोटी ६० लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंग नाईक, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते. मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिद्ध झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार,विनायकराव चारठाणकर,विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर,नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्यसंग्राम तेजस्वीपणे लढला गेला. या मुक्तीसंग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत,गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड,विश्र्वनाथ भिसे,जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल काढणं शक्य नाही. यासीन जूबेर हैद्राबादी मंञी याने मुक्तीसेनेने ताब्यात घेतलेली परत घेण्याची प्रतिज्ञा केली त्यमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुर तालूक्यातील जातेगाव माळावर निजामाच्या सैन्याला पुढे सरकु दिले नाहीत यामध्ये मानसिंग राजपुत, लक्ष्मण आवचार, रामलाल राजपूत, व रामचंद्र धंदेवार हे आघाडीवर होते यामध्ये रामचंद्र धंदेवार याना बाळगिर मठ सरला येथे बंदुकीच्या गोळीने वेध घेतल्याने शहीद झाले त्यावेळी गोदामाय दुथडी भरुन वाहत होती. रामचंद्र याना सिरसागर नावाच्या मर्दाने शहीदास आपल्या पाठीवरुन पैलतीरी आणुन भर पावसात खड्डा केला व त्यांचा विधी पुर्ण केला. निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून १३ सप्टेंबर १९४८ रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले.मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या.पहाटे ४ वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर २ तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. १५ सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते. हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी १७ सप्टेंबर १९४८ रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला. स्वातंत्र्य सेनानींनी आपले आयुष्य ज्या कारणांसाठी वेचले, त्याची जाणीव ठेवून मराठवाड्यातील सामाजिक, आर्थिक, कृषीविषयक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्वांगिण प्रगतीसाठी आपणा सर्वांच्या सहकार्यातून विकासाचा मार्ग चोखाळू या. मराठवाड्याच्या अस्मितेला अभिवादन..!

मराठवाडा इतिहास थोडक्यात
स्वतंत्र्यपूर्व हिंदुस्तान म्हणजे अनेक राजे, सरदार आणि टोळ्यांची संस्थानं, सत्ताकेंद्रांचा वेगवेगळा समूह होता. कालांतराने इंग्रज भारतात आले. व्यापाराच्या उद्देशाने हिंदुस्तानात आलेल्या इंग्रजांनी थेट हिंदुस्तानावर कब्जा केला आणि ते राज्यकर्ते झाले. यात इथे सत्तेवर असलेल्या सर्व राजांचा एक तर पाडाव झाला किंवा ते इंग्रजांच्या अंकीत गेले. निजाम राजवट असलेले हैद्राबाद संस्थानही ब्रिटीश साम्राज्याचा एक हिस्सा ठरले. मराठवाडा हा निजामी राजवटीचाच एक भाग होता. दरम्यान, हिंदुस्तानची फाळणी झाली आणि भारत व पाकिस्तान अशी दोन राष्ट्रं उदयास आली. स्वतंत्र भारतात असलेल्या संस्थानं आणि संस्थानिकांसमोर तेव्हा भारत किंवा पाकिस्तान असे दोन प्रस्ताव ठेवण्यात आले. हा प्रस्ताव भारत सरकार आणि तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ठेवला होता. या प्रस्तावाला प्रतिसाद देत भारतातील जवळपास सर्व संस्थानं भारतात विलिन व्हायला तयार झाली. अपवाद फक्त हैद्राबाद, जुनागड आणि जम्मू काश्मीर या संस्थानांचा. त्यातही हैद्राबाद संस्थान प्रमुख निजामाचा डाव होता की हैद्राबाद हे ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून घोषीत करायचे किंवा पाकिस्तानमध्ये सहभागी व्हायचे. इथे सुरु झाला हैद्राबाद मुक्ती संग्राम आणि मराठवाडा मुक्ती संग्राम असा थरार.

हैद्राबाद मुक्ती संग्राम
हैद्राबाद संस्थान हे महाराष्ट्र (8 जिल्हे), आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड अशा राज्यांमध्ये विस्तारले होते. या संस्थानाचा आवाका विस्तारित असल्यामुळे निजामाने भारत सरकारचा प्रस्ताव धुडकावला आणि थेट पाकिस्तानात सहभागी होण्याची तयारी केली. त्यासाठी त्याने सशस्त्र मार्गाचा अवलंबही केला. त्यामुळे भारत सरकारलाही सशस्त्र कारवाईच करावी लागली. तसाही हा संघर्ष अटळ होताच. कारण, हैदराबाजचा निजाम स्वत:च्या संस्थानासोबत पाकिस्तानात गेला असता तर, भारताच्या मध्यभागी पाकिस्तानचा भूप्रदेश आला असता. आणि भारताच्या भविष्यासाठी कायमचा धोका निर्माण झाला असता. त्यामुळे भारत सरकारने थेट संघर्ष करण्याचा पवित्रा घेतला.

रझाकार संघटनेचा सर्वसामान्यांवर जुलूम
हैद्राबाद संस्थान भारतात सहभागी करण्यात यावे यासाठी प्रचंड मोठी चळवळ उभी करण्यात आली. ही चळवळ स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आली होती. ही चळवळ दडपण्यासाठी निजामाने सशस्त्र मार्ग अवलंबला. त्यासाठी निजामी राजवठीस पाठिंबा देणाऱ्या कासीम रझवी याच्या रझाकार संघटनेचा मोठा हात होता. रझाकार संघटनेने सर्वसामान्य जनतेवर आतोनात अत्याचार सुरु केले होते. त्याचे पडसाद मराठवाड्यातही उमटत होते. त्यातूनच मराठवाडा मुक्ती संग्राम उदयास आला. स्वामी रामानंत तिर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, दिंगबरराव बिंदू, रवीणारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे आदी नेते मराठवाडा मुक्ती संग्राम चळवळीचे नेतृत्व करत होते.

निजाम शरण आला, हैद्राबाद संस्थान खालसा; मराठवाडा मुक्त झाला
भारती सैन्याने हैद्राबाद संस्थान आणि रझाकार संघटनेस चारी बाजूंनी घेरले. 13 सप्टेंबर 1947 रोजी भारतीय सैन्याने आपला मारा वाढवला. त्यामुळे निजामाचे सैन्य आणि रजाकारांना नमते घ्यावे लागले. अखेर हैद्राबाद संस्थान आणि निजामाचा सेनाप्रमुख जनरल अल इद्रीस हा १७ सप्टेंबर १९४८ रोजी भारत सरकारला शरण आला. त्यामुळे खुद्द निजामालाही शरण यावे लागले. हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात सहभागी झाले. परिणामी मराठवाडा मुक्त झाला. मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलन तब्बल १३ महिने लढले गेले. या कारवाईला ‘पोलीस अॅक्शन’ असे संबोधले गेले. सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेली ही पोलीस अॅक्शन देशाच्या इतिहासात अजरामर ठरावी अशीच होती. या कारवाईमुळे आजचा एकसंद भारत उदयास आला.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन – १७ सप्टेंबर
दरम्यान, मराठवाडा मुक्ती संग्राम संपला. मराठवाडा मुक्तही झाला. पण पुढची अनेक वर्षे १७ सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येत नव्हता. या संग्रामनंतर काही वर्षांनी वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून प्रत्येक वर्षी १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात येतो. मरावाडा मुक्ती संग्राम इतिहास चिरंतन राहावा. तो सतत दृष्टीक्षेपात रहावा या विचारातून मराठवाडा मुक्तीदिन समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्याची प्रथा सुरु झाली. या संग्रामाच्या स्मरणार्थ एक मुक्ती स्तंभ उभारण्यात आला. जो आजही औरंगाबाद येथे मोठ्या डौलाने उभा आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: