Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

पद्मभूषण अण्णा हजारे सामाजिक सेवा पुरस्काराने यजुर्वेंद्र महाजन सन्मानित

पुरस्काराची दोन लाख रुपये रक्कम ही दीपस्तंभ मनोबल पुणेच्या उभारणीसाठी

पुणे : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी आणि राळेगणसिद्धी परिवाराच्या वतीने सामाजिक सेवा गौरव पुरस्कार सोहळा हा दरवर्षी प्रमाणे राळेगणसिद्धी येथे नुकताच आयोजित करण्यात आला. देशातील दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना निवासी उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची व्यवस्था उभारणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांना पद्मभूषण अण्णा हजारे सामाजिक सेवा पुरस्कार स्वतः अण्णा हजारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दोन लाख रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पद्मभूषण अण्णा हजारे यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांच्या रकमेतील निधीच्या व्याजातून हे पुरस्कार दिले जातात.

यावेळी देवगडचे महंत भास्करगिरी महाराज, पद्मश्री पोपटराव पवार उपस्थित होते. यावेळी दीपस्तंभ फाउंडेशनचे राजेंद्र पाटील, अमोल लंके, मिलिंद आवळगावकर, महेंद्र पाटील, दिव्यांग विद्यार्थी बापू भोसले आणि आश्लेषा आमटे उपस्थित होते.

यजुर्वेंद्र महाजन यांनी या पुरस्काराची दोन लाख रुपये रक्कम ही दीपस्तंभ मनोबल पुणेच्या उभारणीसाठी दिली आहे.

यावेळी यजुर्वेंद्र महाजन म्हणाले की,  “आदरणीय अण्णा यांनी त्याग, सेवा, संयम आणि कठोर परिश्रमाच्या आधारे चळवळीच्या माध्यमातून लोकशाही सुदृढ केली आहे असे विचार त्यांनी व्यक्त केले. आदरणीय अण्णांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन दीपस्तंभ फाउंडेशनचे कार्य जगभर विस्तारेल.” दीपस्तंभचे विद्यार्थी स्वतःबरोबर आजुबाजूचा समाज हा देखील घडवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल याप्रसंगी दीपक नागरगोजे,अनंत झेंडे, नंदकुमार पालवे ,शिवाजीराव ढोले यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला संत तुकाराम महाराज यांचे नववे वंशज मोरे महाराज, जिल्हा सैनिक अधिकारी , स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी ट्रस्ट, राळेगणसिद्धी संस्थेचे सर्व संचालक, तसेच अनेक कार्यकर्ते, समाजसेवक तसेच अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा पुरस्कार दीपस्तंभ फाउंडेशनच्या भविष्यातील विस्तारासाठी सर्वांना मार्गदर्शन करणाऱ्या मधुकर कोतवाल, अजय साठे, अलका मांडके, पुखराज पगारिया, एम के सत्या, सुधीर वरदे, दीपक शाह,  सल्लागार समितीच्या सर्व सदस्यांना यजुर्वेंद्र महाजन यांनी अर्पण केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading