Tuesday, November 17, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

प्रकाश भोवतालाचे आकलन देतो आणि मनस्थितीही बदलू शकतो : ज्येष्ठ रंगकर्मी, लाईट डिझायनर सौती चक्रवर्ती यांचे प्रतिपादन

केरळचे अरुण लाल यांना यंदाचा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार प्रदान

पुणे :  रंगभूमीवरील प्रकाश भोवतालाचे भान आणि आकलन देतो आणि मनस्थितीही बदलू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी, प्रकाश डिझायनर आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या सिक्कीम केंद्राचे संचालक सौती चक्रवर्ती यांनी येथे केले.

केरळमधील रंगभूमी क्षेत्रात अभिनेता, दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक आणि नाट्यप्रशिक्षक म्हणून गेली २५ वर्षे कार्यरत असलेले अरुण लाल यांना यंदाचा प्रतिष्ठित तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या सिक्कीम केंद्राचे संचालक सौती चक्रवर्ती यांच्या हस्ते सोमवारी प्रदान करणअयात आला. याप्रसंगी ते लाईट डिझाईनिंग या विषय़ावर बोलत होते.

पुण्यातील रुपवेध प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. मानचिन्ह आणि ७५ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक येथील श्रीराम लागू रंग-अवकाश येथे आयोजित विशेष समारंभ प्रसंगी महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे अध्यक्ष एस. पी. कुलकर्णी, संचालक डाॅ. मोहन आगाशे, रंगकर्मी प्रसाद वनारसे, सचिव राजेश देशमुख आणि लागू परिवारापैकी डाॅ. आनंद लागू व्यासपीठावर उपस्थित होते. पुरस्कार सोहोळ्यानंतर अरुण लाल यांनी दिग्दर्शित केलेल्या मट्टीया या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता.

सौती यांनी दृकश्राव्य सादरीकरणाच्या साह्याने रंगभूमीवरील लाईट डिझाईनिंग हा विषय उलगडला. ध्यासविषय आणि व्यवसाय, यांच्यात एकरूपत्व साध्य झालेला मी भाग्यवान रंगकर्मी आहे, असे सांगून सौती म्हणाले, प्रकाश फक्त अंधार उजळवतो असे नाही तर, तो वस्तू, व्यक्ती, घटनांचे संदर्भ बदलू शकतो. प्रकाश आभास निर्माण करतो. तो अनुकूल वा प्रतिकूल मनस्थिती तसेच वातावरणनिर्मिती करू शकतो. रंगभूमीवरील प्रकाश व्यक्तिरेखेची ओळख सिद्ध करू शकतो. प्रकाश किती साधने वापरून निर्माण केला यापेक्षा कोणत्या दर्जाचा प्रकाश निर्माण केला, हे महत्त्वाचे असते कारण प्रकाशाचे डिझाईन आपल्या मनस्थितीवर, विचार करण्याच्या पद्धतीवरही परिणाम करू शकते, असे सौती यांनी स्पष्ट केले.

पुरस्काराचा स्वीकार करताना अरुण लाल म्हणाले, लोककला हीच जीवनशैली असलेल्या ग्रामीण संस्कृतीचा मी प्रतिनिधी आहे. मी नाटक ड्रामा-स्कूल वा विद्यापीठात शिकलो नाही. प्रत्येक सण, जत्रा, परंपरेतून मी ते शिकलो. या अर्थाने मी माझ्या गावाचे प्राॅडक्ट आहे, असे म्हणता येईल. माझ्या जगण्याचा आणि अभिव्यक्तीचा प्रवास नाटक हाच आहे. माझी दोन्ही मुले नाटक करतच वाढत आहेत. आम्ही एकत्रित प्रयत्नांतून आमची रंगभाषा शोधली आणि विकसित केली आहे, ती आम्हाला संवेदनशीलतेने भोवतालाशी जोडते आहे. जेव्हा तन्वीर सन्मानासारखा पुरस्कार मिळतो, तेव्हा आपण योग्य मार्गावर चालत असल्याची पावती मिळते. त्यातून नवी आव्हाने, नवे प्रयोग आणि नवा आत्मविश्वास मिळतो, असे त्यांनी सांगितले.

पुरस्काराविषयी डाॅ. आनंद लागू म्हणाले, रंगभूमीवर वैशिष्ट्यपूर्ण कार्य करत असलेल्या आणि उत्तम प्रगतीच्या शक्यता जपणाऱ्या रंगकर्मीची निवड तन्वीर सन्मानासाठी केली जाते. नाटक आणि दादा (श्रीराम लागू) हे समीकरण होते. मनुष्याला सुसंस्कृत करण्यात नाटकाचे मोठे योगदान आहे, अशी दादांची धारणा होती. त्याला अनुसरून हा पुरस्कार प्रदान केला जातो.

राजेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. वनारसे यांनी परिचय करून दिला. कुलकर्णी यांनी स्वागत केले. मोहन आगाशे यांनी स्वागतपर प्रास्ताविक मांडले.

Leave a Reply