केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराचे लोकनेते अजितदादा पवार नामकरण व पुतळ्याचे अनावरण
पुणे, दि. १६ : दूध संघ, प्राथमिक कृषी पतसंस्था, साखर कारखाने, नागरी सहकारी बँका आणि जिल्हा सहकारी बँकांच्या कामकाजाची इत्थंभूत माहिती असलेले अजितदादा हे ग्रामीण विकास व सहकार क्षेत्राचे चालते-बोलते ज्ञानकोश होते आणि कार्यपद्धती ही नव्या पिढीतील राजकीय नेतृत्वासाठी एका विद्यापीठाप्रमाणे आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा गौरव केला.
पुणे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उभारण्यात आलेल्या लोकनेते अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराला ‘अजितदादा पवार प्रवेशद्वार’ असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर नेहरू मेमोरियल हॉल येथे आयोजित कार्यक्रमात श्री. शाह बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृह राज्यमंत्री योगेश कदम, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, खासदार सुप्रिया सुळे, पार्थ पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, रवींद्र चव्हाण, ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.
अजितदादांच्या कार्याचे स्मरण करताना श्री. शाह म्हणाले, अजितदादा अखेरपर्यंत पुणे जिल्हा, बारामती आणि पिंपरी-चिंचवडच्या प्रश्नांसाठी आग्रही होते. सर्वोच्च पदावर पोहोचल्यानंतरही जमिनीशी नाळ जोडून ठेवणारे आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांशी बांधिलकी जपणारे त्यांच्यासारखे नेतृत्व दुर्मीळ असते.
साखर कारखान्यांवरील प्राप्तिकराचा प्रश्न सोडविण्यासाठी अजितदादांनी सातत्याने पाठपुरावा केला. एखाद्या प्रश्नाचे महत्त्व ओळखून त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. कोविडच्या संकटकाळातील त्यांच्या कार्यतत्परता आणि नागरिकांना वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी त्यांनी केलेला पाठपुराव्यातून लोकांच्या प्रश्नांप्रती असलेली त्यांची आस्था आणि जबाबदारीची जाणीव दिसून येते.
बारामतीच्या विकासात अजितदादांचे मोठे योगदान होते. बारामतीला देशातील सर्वाधिक विकसित मतदारसंघांपैकी एक बनविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. लोकदरबाराच्या माध्यमातूनच जनतेच्या अडचणी समजतात आणि सामान्य नागरिकाला कधीही भेटता आले पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. विकासासाठीचे नियोजन, सातत्य आणि चिकाटीने उद्दिष्ट साध्य करण्याची त्यांची कार्यपद्धती अनुकरणीय होती, असेही श्री.शाह म्हणाले.
अजितदादांची कार्यपद्धती ही नव्या पिढीतील राजकीय नेतृत्वासाठी एका विद्यापीठाप्रमाणे आहे. लोकांशी संवेदनशीलतेने वागणे, कामाचे नियोजन, शिस्त आणि निश्चित वेळेत काम पूर्ण करण्याची त्यांची हातोटी नव्या पिढीने आत्मसात करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराला अजितदादांचे नाव देणे आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याशेजारी त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारणे ही समाधानाची बाब आहे. या माध्यमातून पुढील पिढ्यांना त्यांच्या कार्याची ओळख होऊन प्रेरणा मिळेल, असेही श्री. शाह यांनी नमूद केले.
*अजितदादांची शिस्त, निर्णयक्षमता आणि कामाचा ठसा प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ते कणखर, शिस्तप्रिय, प्रशासनावर पकड असलेले आणि दूरदृष्टीचे नेतृत्व होते. पुणे जिल्हा परिषदेच्या कामकाजाला दिशा देण्यात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे नवे नेतृत्व उभे राहिले. ज्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी पुण्याच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रयत्न केले त्या पुणे जिल्हा परिषदेने त्यांच्या स्मरणार्थ पुतळा उभारणे आणि प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देणे हा त्यांच्या कार्याचा उचित गौरव आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले, एखादी गोष्ट पटली तर ते ठामपणे तिच्या पाठीशी उभे राहत आणि न पटलेली गोष्ट स्पष्टपणे नाकारत. वित्तमंत्री म्हणून अनेक अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी कठीण परिस्थितीतही आर्थिक शिस्त कायम राखली. विकासकामांमध्ये निधीचा योग्य विनियोग, कामांची गुणवत्ता आणि अपेक्षित परिणाम यावर त्यांचा विशेष आग्रह असायचा.
सकाळी सहा वाजता कामासाठी तयार होऊन सात वाजल्यापासून कामकाजाला सुरुवात करण्याची त्यांची शिस्त सर्वांनी अनुभवली आहे. मंत्रालयातही लवकर उपस्थित राहून कामांचा निपटारा करण्याची त्यांची पद्धत होती. महाराष्ट्रातील अनेक विकास प्रकल्पांवर त्यांच्या कामाचा ठसा आहे. वरकरणी कणखर वाटणारे अजितदादा जवळच्या माणसांवर तितकेच उत्कट प्रेम करायचे. सहकारी म्हणून त्यांनी दिलेली साथ आणि मार्गदर्शन कायम स्मरणात राहील. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतही त्यांची पदोपदी आठवण येते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
अजितदादांच्या अपघाती निधनाच्या चौकशीचा चौकशीचा अहवाल लवकरात लवकर यावा यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे विनंती केल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले.
अजितदादांसारखे नेतृत्व संघर्षातून घडते. शेती-मातीशी आणि सामान्य माणसाशी नाळ जोडलेले असे नेतृत्व निर्माण होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. त्यांनी अपूर्ण ठेवलेले कार्य पुढे नेण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
*अजितदादा पुणे जिल्ह्याचा विकासाचे शिल्पकार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, दिवंगत अजितदादांचे पुणे आणि बारामतीशी राजकारणापलीकडचे जिव्हाळ्याचे नाते होते. आमदार, विरोधी पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. सहकार क्षेत्राचाही त्यांना दांडगा अनुभव होता. साखर कारखाने अडचणीत असताना त्यांच्या प्रयत्नातून केंद्र सरकारने साखर कारखान्यांवरील प्राप्तिकर माफ करण्याचा निर्णय घेतला.
शासकीय वास्तूच्या माध्यमातून नागरिकांना न्याय आणि सुविधा मिळाल्या पाहिजेत, अशी त्यांची भूमिका होती. वास्तूंचे बांधकाम करताना प्रत्येक बाबीवर ते बारकाईने लक्ष देत असत. परखडपणा, स्पष्टवक्तेपणा, निर्भीडपणा आणि प्रेमळपणा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. सामान्य नागरिकांचे कल्याण हा त्यांच्या प्रत्येक निर्णयाचा केंद्रबिंदू असायचा. विविध योजनांची आणि प्रकल्पांची सखोल माहिती घेऊन ते निर्णय घेत असत.
पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विकासात अजितदादांचे मोठे योगदान आहे. पुणे मेट्रो, रिंग रोड आणि वाहतूक कोंडी सोडविण्यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये त्यांची भूमिका मोलाची होती. पुण्याचा कायापालट करण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. त्यामुळे त्यांना पुणे जिल्ह्याच्या विकासाचे शिल्पकार म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेले प्रकल्प पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे श्री. शिंदे म्हणाले.
*अजितदादांच्या स्वप्नांचा प्रवास आपण सर्वजण पूर्ण करू – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार*
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, लोकनेते अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण होत असलेला आजचा क्षण अत्यंत भावनिक आहे. ज्या पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी आयुष्य वेचले, त्याच जिल्हा परिषदेच्या प्रांगणात त्यांचा पुतळा उभारला जात आहे, ही अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रातील छोट्या गावांपर्यंत त्यांच्याविषयी असलेले प्रेम हेच त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे खरे प्रमाणपत्र आहे.
अजितदादांचे मातीशी असलेले नाते, ग्रामीण भागातील नागरिकांशी असलेला संवाद आणि विकासकामांचा सातत्याने पाठपुरावा करण्याची त्यांची कार्यपद्धती वैशिष्ट्यपूर्ण होती. शेती, सहकार आणि ग्रामीण विकासाच्या प्रश्नांवर त्यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला.
जिल्हा परिषदेच्या विकासाला दिशा देताना अजितदादांनी केवळ इमारती उभारण्याचा विचार केला नाही, तर गावखेड्यातील माणसांचे भविष्य घडविण्याला प्राधान्य दिले. कार्यालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांना सुविधा मिळाव्यात, परिसर स्वच्छ आणि सुंदर असावा, याबाबत त्यांचा आग्रह होता. पर्यावरणाबद्दलही त्यांना विशेष आस्था होती. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी प्रत्येक गावात, शाळेत आणि आरोग्य केंद्राच्या परिसरात झाडे लावून ती जगविण्याचा संकल्प करूया, असे आवाहन त्यांनी केले.
अजितदादांच्या निधनानंतर गावोगावी भेटी दिल्या असता नागरिकांच्या मनातील त्यांच्याविषयीचे प्रेम अनुभवायला मिळाले. त्यांचा पुतळा आणि प्रवेशद्वाराला दिलेले नाव हे केवळ स्मारक नसून लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्याची जाणीव करून देणारी प्रेरणा आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. अजितदादांचा विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरधवल जगदाळे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण विकासातील दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या योगदाना बाबतची माहिती प्रास्ताविकात दिली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने अजितदादांच्या कार्यकाळातील ग्रामविकासकामांची माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली. तसेच ‘कर्मयोगी दादा’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.
*अजित पवार यांच्या जीवनकार्यावरील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनी*
यावेळी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मान्यवरांनी स्व. अजितदादा पवार यांच्या जीवनकार्याला समर्पित ‘ट्रिब्युट गॅलरी’ला भेट दिली. या छायाचित्र प्रदर्शनीत पुणे जिल्हा परिषद आणि ग्रामीण विकासातील त्यांच्या योगदानाचा दुर्मिळ छायाचित्रांद्वारे आढावा मांडण्यात आला आहे. आरोग्य, तीर्थक्षेत्र विकास, ई-गव्हर्नन्स, जलसंधारण, सिंचन, महिला सक्षमीकरण, शिक्षण, ग्रामविकास तसेच महापुरुषांची स्मारके उभारणी अशा विविध क्षेत्रांतील त्यांच्या कार्याची माहिती यामध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे.
