Sunday, November 15, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘माझ्याकडे बॉम्ब आणि अणुबॉम्ब आहेत, वेळ आल्यावर फोडणार’; ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंना इशारा


जालना : ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणात शिंदे यांनी गप्प न बसता पुढाकार घेऊन सत्य जनतेसमोर आणावे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणासंदर्भात आपल्याकडे आणखी माहिती असल्याचा दावा करत वेळ आल्यास मोठे खुलासे करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
जरांगे म्हणाले, “तुमच्यामुळे त्यांचे सत्तेत राहणे सुरू आहे, त्यांच्यामुळे तुमचे नाही. मग तुम्ही गप्प का बसला आहात? तुम्ही काही घेतलेच नसेल तर घाबरण्याचे कारण काय? ज्याने काही चुकीचे केले नाही, त्याने डरायचे कशाला?” आपल्याविरोधात किंवा आपल्यासंबंधी काही विषारी षडयंत्र रचले जात असेल, तर त्याविरोधात शिंदे यांनी ठाम भूमिका घेतली पाहिजे, असेही त्यांनी सुचवले.
हे प्रकरण दुर्लक्षित केल्यास भविष्यात आणखी कोणते राजकीय डाव आखले जातील, याची कल्पना शिंदे यांना आहे का, असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला. “माझ्याकडे या प्रकरणाची माहिती आहे. माझ्याकडे बॉम्ब, अणुबॉम्ब सगळे आहे. वेळ आली की फोडणार,” असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
संबंधित ऑडिओ क्लिप खरी असल्याचा दावा करत जरांगे यांनी ती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून तयार केलेली नसल्याचे म्हटले. या प्रकरणातील सत्य बाहेर काढण्यासाठी शिंदे आणि संबंधितांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. या कथित क्लिपमुळे शिंदे यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्याचेही जरांगे म्हणाले.
या प्रकरणाच्या तपासावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. एखादा सामान्य माणूस अशा प्रकरणात अडकला असता, तर आतापर्यंत त्याला तुरुंगात टाकले असते. मात्र, संबंधित व्यक्तींचे भाजपशी संबंध असल्यामुळे कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच विशेष तपास पथकाची (एसआयटी) चौकशी सुरू होणे ही बाबही त्यांनी संशयास्पद असल्याचे म्हटले. ही चौकशी अखेरीस ऑडिओ क्लिप खोटी ठरवण्यासाठी केली जात आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हा विषय अत्यंत गंभीर असून त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही जरांगे यांनी दिला. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्य बाहेर काढले नाही, तर त्याचे परिणाम सत्तेतील मोठ्या नेत्यांपेक्षा तळागाळातील कार्यकर्त्यांना आणि गावखेड्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भोगावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply