भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष, त्याग आणि स्वाभिमानाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
पुणे, घोडेगाव :
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आणि जनजातीय गौरव दिनाचे औचित्य साधून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या हस्ते आदिवासी रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच त्यांनी उपस्थितांना संबोधित करत भगवान बिरसा मुंडा यांच्या महान कार्याचे स्मरण करून आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा दिला.
यावेळी बोलताना सुनेत्रावहिनी पवार म्हणाल्या की, स्वातंत्र्यलढ्यात आणि आदिवासी समाजाच्या अस्मितेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे महान क्रांतिकारक, ‘धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांच्या पवित्र स्मृतींना मी विनम्र अभिवादन करते. तसेच जनजातीय गौरव दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देते.
धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांना केवळ २५ वर्षांचे आयुष्य लाभले; मात्र इतक्या कमी वयात किती मोठे कार्य उभे करता येते, हे त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले. ब्रिटिश सत्ता, सावकारी आणि जमीनदारी व्यवस्थेला आव्हान देत त्यांनी ऐतिहासिक ‘उलगुलान’ घडवले. हा केवळ इंग्रजांविरोधातील उठाव नव्हता, तर आपल्या हक्कांसाठी, जमिनीसाठी, अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी उभारलेला बुलंद आवाज होता, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. खानदेश आणि सातपुड्यातील भिल्ल बांधवांनी इंग्रजांच्या जुलमाविरोधात पुकारलेला लढा, राघोजी भांगरे आणि रामजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली महादेव कोळी समाजाने केलेला उठाव तसेच वीर बाबुराव शेडमाके यांनी गोंड वीरांची फौज उभारून ब्रिटिशांना दिलेली झुंज हा महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आहे. अन्यायाविरोधात धैर्याने उभे राहिलेल्या या सर्व ज्ञात-अज्ञात क्रांतिवीरांना मी विनम्र अभिवादन करते, असे त्या म्हणाल्या.
राज्यात संपूर्ण आठवडाभर जनजातीय गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून आदिवासी समाजाची लोकनृत्ये, लोकसंगीत, हस्तकला, वेशभूषा आणि जीवनशैली संपूर्ण देशासमोर येणार आहे. आपल्या पूर्वजांनी जपलेला सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमांमधून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मी स्वतः शेती, पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात काम केले असल्यामुळे निसर्गाशी जोडलेल्या जीवनपद्धतीचे महत्त्व मला जवळून माहिती आहे. जल, जमीन आणि जंगलाशी नातं जोडून जगणाऱ्या आदिवासी समाजाकडूनच माझ्या पर्यावरणप्रेमाला खरी ऊर्जा मिळाली आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक आदिवासी पाड्यापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न सुरू आहेत. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा सर्वसमावेशक विचार ही महाराष्ट्राची ओळख आहे. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत विकासाचा लाभ पोहोचला पाहिजे, हीच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण होती. आदरणीय अजितदादांनीही आयुष्यभर याच विचाराने काम केले. तोच वारसा आम्ही पुढे घेऊन जात आहोत, असे त्यांनी सांगितले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगावच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. आजच्या कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरण, आदिवासी सेवक पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि पारधी मेळाव्यासारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. हे उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत, असे त्यांनी सांगितले.
आदिवासी संस्कृतीची ओळख करून देणारा रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सव हा आरोग्य आणि पौष्टिक आहाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. पारंपरिक रानभाज्या आणि खाद्यपदार्थांना आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनही विशेष महत्त्व आहे. अशा महोत्सवांमुळे पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन होण्यासोबतच या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून आदिवासी भागातील शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध राहील. पारधी समाजासह सर्व आदिवासी घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केल्याबद्दल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. तसेच कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कलावंतांचे आणि आदिवासी बांधवांचे मनापासून कौतुक केले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आणि संघर्षाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प आपण सर्वांनी करूया. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचा गौरव सर्वदूर पोहोचेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी व्यक्त केला.
