Sunday, November 15, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘हनुमान अंश’च्या १०० दिवसांच्या यशाचा इस्कॉन मंदिरात जल्लोष; कार्तिक आर्यनची उपस्थिती

दारू आणि मांसाहारी पदार्थांना फाटा; पाहुण्यांसाठी सात्त्विक शाकाहारी भोजनाची व्यवस्था

मुंबई : बॉलिवूडमध्ये एखादा चित्रपट यशस्वी ठरल्यानंतर त्याचा आनंद साजरा करण्यासाठी आलिशान हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटमध्ये भव्य पार्ट्यांचे आयोजन केले जाते. मात्र, ‘हनुमान अंश’ या चित्रपटाच्या टीमने याला अपवाद ठरत अनोख्या पद्धतीने यशाचा आनंद साजरा केला. चित्रपटाने प्रदर्शनाची १०० दिवसांची यशस्वी वाटचाल पूर्ण केल्यानिमित्त मुंबईतील जुहू येथील इस्कॉन मंदिरात विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अभिनेता कार्तिक आर्यन यानेही उपस्थिती लावली.

या सेलिब्रेशनचे वैशिष्ट्य म्हणजे येथे नेहमीच्या बॉलिवूड पार्ट्यांप्रमाणे मद्यपान किंवा मांसाहारी पदार्थांची व्यवस्था नव्हती. त्याऐवजी पाहुण्यांसाठी सात्त्विक शाकाहारी भोजन ठेवण्यात आले होते. चित्रपटाचा आध्यात्मिक विषय लक्षात घेऊन त्याच वातावरणात यशाचा आनंद साजरा करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला.

सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये कार्तिक आर्यन कार्यक्रमस्थळी पोहोचताना आणि चित्रपटाच्या टीममधील सदस्यांची भेट घेताना दिसत आहे. त्याने भजन आणि प्रार्थनेतही सहभाग घेतल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. या वेगळ्या सेलिब्रेशनची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

‘हनुमान अंश’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील सुरुवात मात्र फारशी प्रभावी नव्हती. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर अवघी १.०८ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यातही कमाईचा आकडा फारसा वाढला नाही. मात्र, तिसऱ्या आठवड्यापासून चित्रपटाच्या कमाईत अनपेक्षित वाढ होऊ लागली. प्रेक्षकांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आणि तोंडी प्रसिद्धी यामुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार मुसंडी मारली.

उपलब्ध आकडेवारीनुसार, चित्रपटाने आतापर्यंत भारतात ३४२.८६ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली असून, जगभरातील एकूण कमाई ४५३.३३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सुरुवातीला अपेक्षित प्रतिसाद न मिळालेल्या चित्रपटाने नंतर ब्लॉकबस्टर यश मिळवत १०० दिवसांचा टप्पा गाठला. या यशानिमित्त आयोजित केलेल्या आध्यात्मिक आणि साधेपणाने पार पडलेल्या सोहळ्यानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Leave a Reply