Sunday, November 15, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सुनील तटकरे दोन ते चार दिवसांत वेगळा राजकीय निर्णय घेणार? महेंद्र दळवींचे खळबळजनक भाकीत


रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्याबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी केलेल्या विधानामुळे रायगडच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. तटकरे यांना आता त्यांच्या पक्षात फारसे महत्त्व दिले जात नसल्याचा दावा करत, ते येत्या दोन ते चार दिवसांत वेगळा राजकीय निर्णय घेऊ शकतात, असे भाकीत दळवींनी केले आहे.
माणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांसह काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना दळवींनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार यांचे निधन होऊन नऊ महिने उलटले असताना तटकरे यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.
तटकरे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत कार्यकर्त्यांना मोठे करण्याऐवजी अनेकांना पक्षातून बाहेर जाण्यास भाग पाडल्याचा आरोपही दळवींनी केला. त्यामुळे पक्षातील त्यांचे राजकीय स्थान कमकुवत झाल्याचा दावाही त्यांनी केला.
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी शिवसेनेचा मजबूत बालेकिल्ला होता. मात्र, सुनील तटकरे यांनी या मतदारसंघात आपले राजकीय वर्चस्व निर्माण केले. आता पुन्हा श्रीवर्धनमध्ये शिवसेनेची ताकद वाढवून हा मतदारसंघ पक्षाचा बालेकिल्ला बनवणार असल्याचे आव्हान दळवींनी दिले.
तटकरे यांच्या विरोधात रायगडमध्ये राजकीय वातावरण तयार होत असून, आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्याविरोधात लढा दिला जाईल, असेही दळवींनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानांमुळे सुनील तटकरे यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Leave a Reply