‘आम्ही माकडं नाही, वाघ आहोत’,’ऑपरेशन टायगर’वरून आदित्य ठाकरे, संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल
मुंबई : ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शिंदे गटाला लक्ष्य केले आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील नेत्यांवर जोरदार टीका करत पक्ष सोडून गेलेल्यांना आता राजकीय अस्तित्वाची चिंता वाटू लागल्याचा दावा केला. तर खासदार संजय राऊत यांनीही शिंदे गटाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत ‘आम्ही माकडं नाही, इथे-तिथे उड्या मारणारे,’ अशा शब्दांत उपरोधिक टोला लगावला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्यांनी महाराष्ट्राशी गद्दारी करून पक्ष सोडला, त्यामागे पैसा आणि सत्ता हेच प्रमुख कारण होते. भाजपच्या दबावाच्या राजकारणामुळे आता या नेत्यांना आपली राजकीय ओळख गमावण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे ते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग शोधत असल्याचे दिसत आहे. या लोकांनी राजकारणाचा स्तर अत्यंत खालावला असून महाराष्ट्राला कोणत्या परिस्थितीत आणून ठेवले आहे, असा सवालही त्यांनी केला.
राज्यातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधताना आदित्य ठाकरे यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर झालेली दगडफेक, रस्त्यावर उतरलेले विद्यार्थी, दुष्काळामुळे अडचणीत आलेले शेतकरी आणि निर्माण झालेली पाणीटंचाई यांचा उल्लेख केला. मराठवाड्यात पंधरा दिवसांतून एकदा पाणी मिळत असल्याची परिस्थिती असून भविष्यात मुंबईलाही अशाच संकटाचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा त्यांनी दिला. वाढते प्रदूषण, गोकुळमधील घडामोडी आणि मतचोरीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
दरम्यान, संजय राऊत यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवरून शिंदे गट आणि भाजपवर टीका केली. हे दोन्ही पक्ष अमित शाह यांच्या नियंत्रणाखाली असल्याचा आरोप करत शिंदे गटाला स्वाभिमान बाजूला ठेवून काम करावे लागत असल्याचे ते म्हणाले. या गटाकडे स्वतंत्र विचारधारा नसून सत्तेच्या आकर्षणामुळेच नेते एकत्र असल्याचा दावाही त्यांनी केला.
उदय सामंत यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबतही उपरोधिक टिप्पणी केली. ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा करून त्यांनी आम्हाला वाघ असल्याचे मान्य केले आहे. आम्ही माकडं नाही, की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उड्या मारत राहू, असे राऊत म्हणाले.
अमित शाह यांच्या प्रभावाखालील दोन्ही पक्षांनी आधी आपापला पक्ष सांभाळावा. महाराष्ट्रातील राजकीय संघर्षाचे मैदान इथेच आहे, असे आव्हानही राऊत यांनी दिले.
