Monday, November 16, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

राहुल गांधींनी परदेशात जाऊन देशाची बदनामी करण्यापेक्षा गावोगावी फिरून जनतेचे प्रश्न समजून घ्यावेत : अमित शाह


काँग्रेसवर जोरदार निशाणा; सहकार क्षेत्राच्या विकासासाठी पुण्यातून नवा रोडमॅप, बंद साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न
पुणे : काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार राजकीय हल्ला चढवताना केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताची प्रतिमा मलिन करण्याऐवजी देशातील गावागावांत जाऊन जनतेचे प्रश्न समजून घ्यावेत, असा सल्ला दिला. काँग्रेसला सलग तीन वेळा निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्याने हा पक्ष सातत्याने सरकारवर टीका करत असल्याचा आरोपही शाह यांनी केला. दरम्यान, महाराष्ट्र ही देशातील सहकार चळवळीची जन्मभूमी असल्याने सहकार क्षेत्राच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवातही पुण्यातून होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यात आयोजित कार्यक्रमात बोलताना शाह यांनी केंद्र सरकारच्या सहकार क्षेत्रविषयक धोरणांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना करून या क्षेत्राला स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. स्वातंत्र्यानंतर जवळपास ७० वर्षे शेतकरी स्वतंत्र सहकार मंत्रालयाची मागणी करत होते. मात्र, काँग्रेसच्या सत्ताकाळात ही मागणी पूर्ण झाली नाही, अशी टीका त्यांनी केली.

Leave a Reply