प्रशासकीय सेवेत शॉर्ट कटचा वापर करू नका न्या.एल.नरसिंम्हा रेड्डी

पुणे, 16 सप्टेंबरः “ भारताला विश्व गुरू बनविण्यासाठी प्रशासकीय अधिकार्‍यांनी आपल्या सेवेत पारदर्शकता, प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम, मानवता आणि प्रगतीसाठी सदैव सहभागी व्हावे. तसेच, प्रशासकीय सेवेमध्ये कधीही शॉट कटचा वापर करू नये.” असा सल्ला केंद्रीय प्रशासकीय अधिकरणाचे अध्यक्ष व पटणा उच्च न्यायालयाचे माजी न्या.एल. नरसिंम्हा  रेड्डी यांनी दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग), पुणेतर्फे यूपीएससी स्पर्धा परीक्षा-2019 मधील यशस्वितांच्या 12 व्या राष्ट्रीय स्तरावरील सत्कार आणि प्रोत्साहन सोहळा व ‘प्रशासकीय सेवेच्या परिक्षेची तयारी कशी करावी आणि प्रशासकीय सेवेसमोरील आव्हाने’ या विषयावरील चार दिवसीय परिषदेच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या वेळी लाला बहाद्दुर शास्त्री नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅडमिस्ट्रेशनचे संचालक डॉ. संजीव चोपडा, लोकसभेचे माजी महासचिव अनूप मिश्रा, नवी दिल्ली येथील मनोहर पर्रीकर इन्स्टीट्यूट फॉर डिफेन्स स्टडी अँड अ‍ॅनॅलिसेसचे संचालक सूजान चिनॉय व भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. एव्हीएस रमेश चंद्रा हे प्रमुख सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ.एन.टी. राव, मिटसॉगचे वरिष्ठ संचालक रविंद्रनाथ पाटील व सहयोगी संचालिका प्रा. डॉ. शैलश्री हरिदास हे उपस्थित होते.
यूपीएससी 2019 मध्ये भारतात प्रथम आलेला प्रदिप सिंग याला रूपये 51 हजाराचे पारितोषिक व सन्मानपत्र त्यांना पाठविण्यात येणार आहे.
न्या.एल. नरसिंम्हा  रेड्डी म्हणाले,“ प्रशासकीय अधिकार्‍यांकडे मोठ्या प्रमाणात अधिकार असतात. त्याचा योग्य वापर करून प्रत्येकाने समर्पण भावाने कार्य करावे. समर्पण भाव हा अत्यंत महत्वाचा आहे, कुटुंबाची पर्वा न करता भारतीय सैनिक सीमेवर जी सेवा देतात तशी सेवा दयावी. या सेवेत पैशाला अधिक महत्व न देता सेवा महत्वाची आहे.”
यूपीएससी 2019 मध्ये प्रथम रैंक प्राप्त करणारे प्रदिप सिंग म्हणाले, इंजिनियरींग केल्यानंतर 2016 मध्ये यूपीएससीची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही. मन खचल्यामुळे वडिलांनी व मित्रांनी प्रोत्साहन दिले. कठोर परिश्रमाच्या जोरावर भारतात प्रथम आलो. या परिक्षेची तयारी करतांना स्मार्ट वर्क बरोबर रोज तीन तास मन लावून अभ्यास करावा. दृढ निश्चय व अभ्यासात सातत्य ठेवल्याने यश तुम्ही खेचून आणू शकता.
ए.व्ही.एस रमेश चंद्रा म्हणाले,“प्रशासकीय सेवा करतांना पारदर्शकता, समर्पण आणि परिश्रमेच्या भावनेने सेवा करावी. सिव्हील सर्व्हिसमध्ये चांगले कर्मयोगी बना, तुम्ही अशी सेवा करा ज्याने समाजाची प्रगती होईल. आपल्या देशाने वसुधैव कुटुम्बकमची शिकवण दिली आहे, ती गोष्ट लक्षात असू दयावी. सध्या कोविड 19 च्या काळात भारताची स्थिती संपूर्णपणे वेगळी झाली आहे.”
अनूप मिश्रा म्हणाले,“ बाहुबली बनून या सेवेत सर्वांचा आदर, मानवता आणि स्मित हास्य चेहरा ठेवून कार्य करावे. त्यासाठी कठीण परिश्रम आणि समर्पणाचे गुण आपल्या अंगी भिनवावे. या क्षेत्रात का आलो हे ओळखून सार्वजनिक सेवेचे व्रत हे महत्वाचे आहे, याचे भान ठेवावे. जीवनात बरेच प्रलोभने येतील या पासून सर्वांनी सावध रहावे.”
सुजॉन चिनॉय म्हणाले,“  देशातील सर्वात शेवटच्या मानवाचा विकास झाला पाहिजे हे सूत्र धारण करून प्रशासकीय सेवा करावी. सर्वांचा विकास हा मंत्र काम करतांना सदैव लक्षात असावा. सध्या या देशात सायबर सुरक्षेवर खूप मोठ्या प्रमाणात कार्य होणे गरजचे आहे.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ देशातील सर्व यूपीएससीतील यशस्वीतींचा सत्कार कार्यक्रमाने आज एक तप पूर्ण केला आहे. लॉकडाउनच्या काळात डॉक्टर आणि प्रशासकीय लोकांची सर्वात मोठी भूमिका आहे. भविष्यात प्रशासकीय स्तरावरील लोकांना घेऊन समाजात काही नवीन पॉलिसी स्तरावर कार्यकरण्याचा मानस आहे. आज आपल्या माध्यमातून देशाला चांगले प्रशासक मिळाले आहेत. जगात भारतीय प्रशासकीय सेवा ही सर्वात चांगली आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: