fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

शहरात ऑक्सिजनचा तुटवडा,  इंडस्ट्रियला ऑक्सिजन दिल्यामुळे आरोग्यसेवा व्हेंटिलेटरवर  -आबा बागुल 

पुणे – शहरात कोविड -१९ कोरोना विषाणूची लागण मोठ्याप्रमाणात वाढलेली असून गेल्या काही काळात पुणे देशातील सगळ्यात मोठे हॉट स्पॉट सिटी बनलेले आहे. ही काळजीची बाब आहे. शासन व महानगरपालिका माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाय केले जात असतानाही त्यास अपेक्षित यश येताना दिसत नाही. तसेच मृत्यूचे थैमानही कमी होताना दिसत नाही. या परिस्थितीत ऑक्सिजन पुरवठा करणे, शहरात डॉक्टरची फिरती पथके तयार करणे , कोरोनाची सौम्य लक्षणे आलेल्या रुग्णांवर घरीच उपचार करणे व बाहेरून येणाऱ्या रुग्णांची व नातेवाईकांची शहराच्या नऊ कॉरिडॉर मधून प्रवेश करताना आरोग्य तपासणी करून तेथील जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे यामुळे कोरोना रुग्णांना चांगले उपचार मिळतील व कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होईल अशी मागणी महाराषट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पात्रात काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी केली आहे.
ते म्हणाले की , पुणे शहरात विविध हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या कोरोना रुग्णांना त्यांची तब्येत ढासळत असताना ऑक्सिजन देण्याची नितांत गरज असते. तसेच व्हेंटिलेरसाठीही ऑक्सिजन महत्वाचे आहे.मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि अपुरा ऑक्सिजन पुरवठा यामुळे अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. हे लक्षात घेऊन इंडस्ट्रियल ऑक्सिजनचा पुरवठा तात्काळ बंद करून तो ऑक्सिजन हॉस्पिटल्सला पुरवणे ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी किमान एक महिना अथवा आवश्यकता असेल तर अधिक काळ पुणे व परिसरात दिला जाणारा इंडस्ट्रियल ऑक्सिजनचा पुरवठा थांबवून तो संपूर्ण ऑक्सिजनचा पुरवठा कोरोना रुग्णांच्यासाठी वापरणे बंधनकारक करावे. तसेच पुणे शहरात इनॉक्स कंपनी शहरातील हॉस्पिटला ऑक्सिजनचा पुरवठा करत असून त्यासोबत इंडस्ट्रियलला ही मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करते. त्यांनी शहरात निर्माण होणारा ऑक्सिजन शहरासाठीच उपलब्ध करून द्यावा. क्षमता असतानाही सध्या एक शिफ्ट मध्ये सुरु असलेले काम शिफ्ट वाढवून करण्यात यावे याबाबत एफडीआयशी संपर्क करून त्यांना सूचना देण्यात याव्यात त्यामुळे शहरातील हॉस्पिटला ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.
शहरामध्ये अनेक हॉस्पिटलमध्ये रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून रुग्णालयात पुरेशी व्यवस्था नाही म्हणून डिस्चार्ज केले जाते,पैसे नाही म्हणून काढले जाते. या-ना त्या कारणाने रुग्णांना उपचारास प्रतिबंध करण्यात येतो व आपली जबाबदारी झटकून व्यवस्थापन मोकळे होते. त्यामुळे नागरिकांची धावपळ होऊन रुग्णांचा हकनाक बळी जात आहे. त्यासाठी शहरामध्ये अनुभवी डॉक्टरांची फिरकी पथके करून शहरातील हॉस्पिटलवर करडी नजर ठेवण्याची आवश्यकता आहे . हॉस्पिटलवर अचानक धाड मारून रुग्णांना मिळत असलेल्या उपचाराची पाहणी करून हॉस्पिटलमध्ये किती बेड शिल्लक आहेत,ऑक्सिजनची सुविधा कशी आहे, रुग्णांवर योग्य उपचार केले जातात का ? यासर्वांची पाहणी करण्यासाठी शहरातील सहा मतदार संघांत डॉक्टरांचे सहा फिरते पथके तयार करून त्यांचे सोबत महानगरपालिकेचे अधिकारी नेमावेत. अश्या प्रकारे डॉक्टरांचे फिरते पथक शहरात असल्यावर हॉस्पिटलवर त्याचा चांगला परिणाम होईल व शहरात मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच उपचार देण्यासाठी शहरात अनेक डॉक्टर ६००० रुपयांमध्ये कंसल्ट करत असून त्यांचे नंबर महानगरपालिकेकडे उपलब्ध आहेत. ते महानगरपालिका आयुक्तांनी प्रसिद्ध करून कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नागरिकांनी घरीच उपचार घ्यावे असे आवाहन करण्यास सांगावे. कोरोनावर उपचार करण्यासाठी सगळीकडे औषधे सारखीच आहेत. ही औषधे देऊन डॉक्टर रुग्णांना फोनवर १० दिवस कंसल्ट करतील व अतिशय गंभीर असलेल्या रुग्णांना म्हणजेच ऑक्सिजन कमी झालेल्या रुग्णांना, श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या रुग्णांनाच हॉस्पिटलमध्ये दाखल करावे त्यामुळे शहरातील आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होईल व नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळेल. ८० टक्के नागरिकांना कोरोनाची सौम्य लक्षणे असताना ते घरीच उपचार घेतील त्यामुळे देखील शहरात कोरोना आटोक्यात येण्यास मोठी मदत होईल.
पुणे शहरात ग्रामीण भागाच्या तुलनेत मोठ्याप्रमाणात आरोग्य सुविधा आहेत. त्या मुळातच कोरोनाग्रस्त पुणेकरांना कमी पडत आहेत. मात्र लोणावळा,खंडाळा,सातारा,सांगली,कोल्हापूर,नगर अश्या विविध भागातील कोरोना रुग्ण पुण्यात उपचारासाठी येताना दिसतात. त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईक व मित्र परिवारही असतात. दुरदैवाने हे कोरोना बाधित रुग्ण हॉस्पिटलमध्ये प्रवेश घेण्यासाठी पुण्यात येताना यांची कोणतीही चाचणी पुण्याच्या हद्दीपाशी केली जात नाही. त्यांची पुण्याच्या हद्दीपाशी तपासणी करून जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे. पुण्यात प्रवेश करण्यासाठी एकूण नऊ रस्ते असून त्यातून मोठ्याप्रमाणात बाहेर गावाहून कोरोना रुग्ण येतात. ते शहरातील हॉस्पिटलमध्ये प्रवेश घेतात. त्यांच्या बरोबरचे नातेवाईक पुण्यातच राहतात . त्यामुळे पुणेकरांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. हे लक्षात घेऊन पुण्यात येण्यासाठी असलेले नऊ कॉरिडॉर मधून प्रवेश केला जातो. अश्या नऊ ठिकाणी राज्य शासन व महानगरपालिकेने तातडीने चाचणी केंद्रे उभी व डॅशबोर्ड उभारून कोणत्या हॉस्पिटलमध्ये जागा आहे. याचे मार्गदर्शन देखील तेथेच केले जावे. त्या प्रत्येकाची चाचणी केल्यानंतर कोरोना रुग्ण तेथील जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावा. त्यामुळे रुग्णांची धावपळ होणार नाही व रुग्णांचा हकनाक मृत्यू होणार नाही. तसेच रुग्णाबरोबर बरोबर असलेल्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे की नाही याची तपासणी करावी. व असल्यास कोरोनटाईन शिक्के मारावेत. ज्यांना तपासणी अंती कोरोनाची लागण नाही त्यांना मुक्तपणे प्रवेश देण्यास हरकत नसावी.
या बाबतीत आपण अतिशय गांभीर्याने लक्ष घालावे. व ऑक्सिजन पुरवठा रुग्णांना सुरळीतपणे चालू राहील. याची खात्री करावी, शहरात डॉक्टरची फिरती पथके तयार करावीत , कोरोनाची सौम्य लक्षणे आलेल्या रुग्णांवर घरीच उपचार करण्याचे आवाहन करावे तसेच बाहेर गावाहून पुण्यात येणाऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे म्हणजे कोरोनाचा प्रभाव, प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत होईल त्याबद्दल त्वरित कृती कराल तेवढ्या लवकर पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. यावर गांभीर्याने विचार करून निर्णय घ्यावा असे आबा बागुल शेवटी म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading