Wednesday, September 16, 2026
Latest NewsPUNE

आत्महत्या आणि आत्मनिर्मिती यांमध्ये संतुलन कसे राखावे, हा मुद्दा महत्त्वाचा – डॉ. उल्हास लुकतुके

पुणे : एखादी व्यक्ती दु:खात गाडली गेली आहे, म्हणून आत्महत्या करते असे असेल सुद्धा, पण इतके दु:ख आहे की त्यातून सुटावे असे वाटते म्हणून मी जीव देतो, जीव दिला यातच मला आनंद आहे अशी म्हणणारी माणसेही आहेत. याच आनंद- दु:ख यांच्या अनेक हेलकाव्यांमधून आत्महत्या केलेला माणूस गेलेला असतो. या सगळ्याचे करायचे काय हा प्रश्न असून एकीकडे आत्महत्या (अर्थात सुसाईड) तर दुसरीकडे निर्मितीशील वागणे (सु-जेनेरीस) या दोहोंमध्ये संतुलन कसे राखावे हा खरा मुद्दा असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके यांनी केले.

मरावसं वाटतंय पण जगण्याची काहीतरी व्यवस्था करा बाबा, काय कटकट आहे हो जगण्याची यापेक्षा मरण बरं हा वैचारिक संघर्ष असून आत्महत्या व आत्म निर्मिती यांमधील संघर्षाचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याकडेही डॉ. लुकतुके यांनी लक्ष वेधले.

मनोविकास प्रकाशनच्या वतीने मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संज्योत देशपांडे लिखित ‘आत्महत्या हे उत्तर नाही’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. लुकतुके यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी बोलत होते. विधी महाविद्यालय रस्त्यावरील भांडारकर संशोधन संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात सदर पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अरुण गद्रे, अभिनेत्री अमृता सुभाष, अभिनेते संदेश कुलकर्णी, पुस्तकाच्या लेखिका डॉ. संज्योत देशपांडे, मनोविकास प्रकाशनाचे आशिश पाटकर व्यासपीठावर उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय सेल्फ केअर डेचे औचित्य साधत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजेश देशमुख यांनी अमृता सुभाष व संदेश कुलकर्णी यांची मुलाखत देखील घेतली. आत्महत्या, आत्मघात, मानसिक आरोग्य या विषयांवर व्यक्त होणारी चित्रकार संजय गणोरकर यांची इलष्ट्रेशन्स आणि जयंत जोशी यांचे चित्रे यावेळी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली. याबरोबरच सभागृहात सुलेखनकार बी जी लिमये यांनी रेखाटलेल्या सुलेखानातील कविताही लावण्यात आल्या होत्या.

आत्महत्या हा एक क्लिष्ट विषय आहे असे सांगत डॉ. लुकतुके पुढे म्हणाले की, “दु:ख आहे, दु:ख मुक्त स्थिती आहे, दु:ख मुक्त स्थिती प्राप्त करण्याची शक्यता आहे आणि ती प्राप्त करण्यासाठी मार्गपद्धती अर्थात विधी आहे ही गौतम बुद्धांनी सांगितलेली आर्यसत्ये आपल्याला जगण्याचा मूलभूत विचार देतात.”

भारतीय सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आयसीएमआरच्या ताज्या अहवालानुसार आज ८.५ कोटी नागरिक देशात मानसिक आजाराने ग्रस्त असून यातील ३.५ कोटी नागरिक हे नैराश्याने ग्रासले आहेत. मागील पाच वर्षांत महाराष्ट्रात नैराश्याचे रुग्ण २१ टक्क्यांनी वाढले आहेत तर भारतात या वाढीचे प्रमाण १९ टक्के आहे. आज भारतात दररोज सरासरी ३४२ आत्महत्या होत आहेत त्यात २३ टक्के घटनांमध्ये नैराश्य हे मुख्य कारण आहे, अशी माहिती डॉ. अरुण गद्रे यांनी दिली.

सध्या ज्या हिंसक लाटांमधून जग जात आहे, त्यामध्ये हे पुस्तल परामर्श देते. डॉ. संज्योत देशपांडे यांनी पुस्तकात आत्महत्ये संबंधीच्या गैरसमजांबद्दल प्रबोधन तर केले आहेच शिवाय आत्महत्येची कौटुंबिक, सामाजिक, मानसिक, आर्थिक, वैयक्तिक, वैचारिक, ऑनलाईन अशा विविध स्तरांवरील कारणेही तपासली आहेत, असे डॉ. गद्रे यांनी सांगितले.

वडीलांना स्मृतिभ्रंश  झाल्यानंतर त्या आजाराला सामोरे जाताना मी स्वत:ला कामात गुंतवून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र, मला मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे ही जाणीव विजय तेंडूलकर यांनी करून दिल्यानंतर त्या नैराश्यामधून बाहेर पडता आले असे आपले अनुभव अमृता सुभाष यांनी संगितले. विजय तेंडूलकर यांनी दिलेल्या या सल्ल्यासाठी मी कायम त्यांची ऋणी असले असेही सुभाष म्हणाल्या.

नैराश्याला तुम्ही जेवढे दाबाल तेवढे ते अधिक वेगाने सापासारखे फणा काढून तुमच्यासमोर येईल, त्यामुळे त्याचा स्वीकार करीत तज्ज्ञांची मदत घेणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सुरुवातीला सतत होणारे काहीना काही शारीरिक त्रास ही नैराश्याची चिन्हे आहेत हे समजायला थोडा वेळ जावा लागला मात्र तज्ज्ञांच्या मदतीने आणि औषधांच्या जोरावर नैराश्यातून बाहेर आलो असे सांगत संदेश कुलकर्णी म्हणाले, “तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता, रोज उठून काय करायचे हा प्रश्न पडायचा. कलाकार मंडळी ही संवेदनशील असल्याने खूप लवकर नैराश्याच्या गर्तेत सापडतात आणि संवेदनशील असण्याची किंमत मोजतात असे मला वाटते.”

नैराश्यातून बाहेर येण्यासाठी त्याचा रोज स्वीकार करणे, त्यातून बाहेर पाडण्यासाठी रोज प्रयत्न करणे, सराव करणे आणि याबरोबरच तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार घेणे महत्त्वाचे असते असेही ते म्हणाले. आज समाज म्हणून आपण मानसिक साक्षर नसून, ते होण्याची गरज संदेश कुलकर्णी यांनी अधोरेखित केली.

“आत्महत्या हा आपल्या नैसर्गिक प्रेरणेच्या विरोधात जाऊन दिलेला लढा आहे त्यामुळे आत्महत्या करणे सोपे नसते. आत्महत्या करणारी व्यक्ती ही त्या नैसर्गिक प्रेरणेशी लढत असते आणि त्यामुळे त्या व्यक्तीला आत्महत्या करण्यासाठी खूप तयारी, खूप सराव करावा लागतो. हेच कारण आहे की अनेकदा आत्महत्या या रोखता येऊ शकतात. मात्र यासाठी आपण समाज म्हणून अधिकाधिक संवेदनशील असण्याची, आपल्या आजूबाजूला काय चालू आहे हे जाणून घेण्याची गरज आहे,” असे मत डॉ. संज्योत देशपांडे यांनी व्यक्त केले.

आशिश पाटकर यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक केले तर डॉ. संज्योत देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश देशमुख यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading