घरंदाज तबलावादनातील श्रीमंती टिकली ती उस्ताद गुलाम रसूल खांसाहेब यांच्यामुळे : पंडित सुरेश तळवलकर
‘नादब्रह्मांजली’ कार्यक्रमात सलीम अख्तर यांचे तबला वादन तर विदुषी मंजुषा पाटील यांचे शास्त्रीय गायन
पुणे : उस्ताद गुलाम रसूल खांसाहेब कलेचे चाहते होते. गुणी कलाकारांचे मनापासून कौतुक करायचे. घरंदाज तबलावादनातील श्रीमंती टिकण्यासाठी यांनी अपार कष्ट घेतले. महाराष्ट्रात खानदानी तबला वादन आजही सुरू आहे त्याचे श्रेय खांसाहबे यांना जाते, असे गौरवोद्गार पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांनी काढले.
तबला वादनातील फारुखाबाद घराण्याची परंपरा यशस्वीरित्या पुढे नेण्यात बहुमोल योगदान देणारे मरहूम उस्ताद गुलाम रसूल खांसाहेब यांच्या 30व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या शिष्य परिवारातर्फे ‘नादब्रह्मांजली’ या गायन-वादन मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफलीचे उद् घाटन पं. तळवलकर आणि खांसाहेब यांच्या शिष्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. त्या वेळी त्यांनी खांसाहेब यांचे शिष्य आणि सुहृदांशी संवाद साधला. भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, खांसाहेब यांचे नातू सलीम अख्तर, प्रसिद्ध गायिका मंजुषा पाटील, सुरेंद्र मोहिते व्यासपीठावर होते.
पंडित तळवलकर म्हणाले, उस्ताद अमिर हुसेन खांसाहेब यांच्यामुळे आम्ही कलेच्या क्षेत्रात श्रीमंत झालो. श्रीमंत होण्याची पायभूत रचना उस्ताद गुलाम रसूल खांसाहेब, नागेशकर गुरुजी यांनी केली. सलीम अख्तर यांचे आजचे तबलावादन अप्रतिम होते, अशा शब्दात त्यांनी कौतुक केले.
उस्ताद गुलाम रसूल खांसाहेब यांचे गंडाबंद शिष्य पांडुरंग मुखडे प्रास्ताविकात म्हणाले, खांसाहेब यांचा सहवास आयुष्यात खूम मोलाचा ठरला. गुरुंच्या सहवासात रहायला मिळाल्याने अनेक दिग्गज कलाकारांचे गायन-वादन ऐकायला मिळाले. कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिकाही त्यांनी विशद केली.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात सलीम अख्तर यांचे एकल तबलावादन झाले. त्यांनी वादनात पेशकार, कायदे, रेले, गती, तुकडे, चक्रदार, परण, चलन सादर केले. त्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली. शंतनू खेर यांनी लेहरा साथ केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विदुषी मंजुषा पाटील यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी राग पुरियामधील पारंपरिक बंदिशी सादर केल्या. त्यांना प्रशांत पांडव (तबला), अभिषेक शिनकर (हार्मोनियम), तनिष्क अरोरा, रसिका वैशंपायन (तानपुरा, सहगायन) यांनी साथ केली. कार्यक्रमाचे निवेदन ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक रवींद्र खरे यांनी केले. मान्यवर आणि कलाकारांचा सन्मान सलीम अख्तर, रुखसाना खान, प्रकाश पंडीत, भरत जंगम, राजू जावळकर यांनी केला.