Friday, November 20, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

बालसंसदेतील विद्यार्थ्यांचे प्रश्न संबंधित मंत्र्यांपर्यंत पोहोचवून सोडविणार – आदिती तटकरे

पुणे : राज्यस्तरीय बालसंसदेत विद्यार्थ्यांनी मांडलेले प्रश्न संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि विभागीय मंत्र्यांपर्यंत पोहोचवून त्यावर कार्यवाही करण्यासाठी शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी दिली.
यशदामध्ये महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, यशदा आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बाल संसद २०२६’ मध्ये त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांच्या भूमिका पार पाडत शाळांची मैदाने, क्रीडा सुविधा, अंगणवाड्या आणि महिला लोकप्रतिनिधींचे सक्षमीकरण अशा विविध विषयांवर प्रश्न उपस्थित केले.

बालसंसदेत मांडलेले प्रश्न लेखी स्वरूपात प्राप्त झाल्यानंतर ते संबंधित मंत्र्यांकडे पाठविण्यात येतील. शाळांच्या मैदानांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याबाबत, तर अंगणवाड्यांच्या प्रश्नांवर संबंधित विभागामार्फत कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे तटकरे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि आत्मविश्वासाने प्रश्न मांडले असून, त्यांच्यातील सामाजिक व लोकशाहीविषयक जाणीव कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक यांनी बालसंसदेत मांडलेल्या मागण्या मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळापर्यंत पोहोचविण्यात येतील, असे सांगितले. बालसंसद हे मुलांमधील नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता विकसित करणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युनिसेफच्या प्रतिनिधी क्रिस्टिना यांनी २०४७ पर्यंत प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण, समान संधी आणि सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी बालकेंद्रित विकासाला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली.
‘माझे हक्क, माझा आवाज… विकसित महाराष्ट्राचा ध्यास!’ या संकल्पनेवर आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना लोकशाही व्यवस्था, शासनाचे कामकाज आणि लोकप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

Leave a Reply